सुनील तटकरे यांनी शिवसेनाविरोधात रणशिंग  फुंकले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग  – राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सोयरीक मात्र रायगड जिल्ह्यात जुळत नसल्याचा प्रत्यय पून्हा एकदा नगर पंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आला आहे. माणगाव नगर पंचायतीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्याची गंभीर दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेऊन भविष्यात जिल्हयातील राजकारणात शिवसेने सोबत दोन हात करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे आता रायगड जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.

 माणगाव तालुक्यातील निजामपूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने बुधवारी मेळावा आयोजित केला या मेळाव्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या रायगड जिल्हयातील कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याचे माहिती असतानाही त्यांच्यावर अश्लिल भाषेत टीका करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राज्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षांनी आपापल्या परीने उत्तर दिले मात्र माणगाव मधील एक नगर पंचायत मिळावी म्हणून शिवसेनेने याच भारतीय जनता पक्षाची मदत घेतली राजकारणात इतकी लाजिरवाणी परिस्थिती मी पाहिली नाही पक्ष प्रमुखांवर टीका आणि दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध करणारी भाजप मतांसाठी शिवसेनेला चालते, हे लोक पक्षाजवळ काय निष्ठा ठेवणार अशा शब्दांत तटकरे यांनी सेनेला फटकारले. माणगाव नगर पंचायतीत झालेल्या पराभवाचा वचपा आता राष्ट्रवादी काढल्याशिवाय राहणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले

 खासदार सुनील तटकरे यांच्या या आœमक भुमिके मुळे आता जिल्हयातील सेना राष्ट्रवादी मधील वाद विकोपाला गेला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे याबाबत आता शिवसेना काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.निजामपूर विभागातील प्रसाद गुरव, मिलींद फोंडके यांच्यासह काही शिवसैनिकांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार अनिकेत तटकरे, महाड पोलादपूर विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर,निजामपूर विभाग अध्यक्ष संदीप जाधव, तालुका अध्यक्ष सुभाष केकाणे, माजी सभापती संगिता बककम यावेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power of the state nationalist congress nationalist dakhal mp sunil tatkare akp
First published on: 29-01-2022 at 00:01 IST