NCP Leadership Crisis Maharashtra: अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अजितदादांच्या पश्चात अवघ्या चारच महिन्यांत पक्षात निर्माण झालेला संघर्ष लक्षात घेता राष्ट्रवादीची भविष्यातील वाटचाल खडतर असल्याचीच एकूण लक्षणे दिसू लागली आहेत.
पक्षाच्या वतीने २९ एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेले पत्र आयोगाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याने नव्याने वादाला तोंड फुटले आहे. कारण या पत्रात प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तर सुनील तटकरे यांचा सरचिटणीस म्हणून उल्लेखच नाही. याचाच अर्थ पटेल व तटकरे हे दोघे आता पक्षाचे पदाधिकारी राहिलेले नाहीत. त्यातच पटेल व तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्याचे समोर आल्याने हा वाद विकोपास गेल्याचेच दिसू लागले आहे. आता हा संघर्ष टोकाला गेल्यावर पक्षाच्या वतीने पटेल व तटकरे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत व वादावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक. घेतली जाईल, असे सांगण्यात येत असले तरी पक्षात सारे काही आलबेल नाही हा संदेश गेला आहे.
अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर २६ फेब्रुवारीला पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात राष्ट्रीय पदाधिकारी व कार्यकारिणीवरील सदस्यांची यादी सादर करण्यात आली. त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील आदी जुन्याजाणत्या नेत्यांचा समावेश होता. अर्थात, या पत्रात अध्यत्र सुनेत्रा पवार व शिवाजी गर्जे खजीनदार अशा दोनच पक्षांचा उल्लेख होता. प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष असले तरी त्यांच्या पदाचा उल्लेख का नाही, असा प्रश्न तेव्हाही उपस्थित झाला होता.
गेल्या काही दिवसांत पक्षातील निर्णय प्रक्रियेवरून प्रफुल्ल पटेल आणि खासदार पार्थ पवार यांच्यात शीतयुद्ध सुरूच आहे. अशातच पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेले पत्र प्रसिद्ध झाल्याने वाद आणखीस विकोपास गेला. कारण राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांची नावे गायब झाली आहेत. २६ फेब्रुवारीला सादर करण्यात आलेल्या यादीत या सर्व नेत्यांची नावे होती. मग २९ एप्रिलच्या पत्रात ही नावे नसल्याने प्रफुल्ल पटेल, भुजबळ, तटकरे आदींना पक्षाच्या कार्यकारिणीतून डच्चू दिल्याचा अर्थ काढला जाऊ लागला. ‘पक्षाच्या कार्यकारिणीतील नावांबाबत प्रशासकीय चूक झाली असून, ती लवकरच दुरुस्त केली जाईल’ अशी सारवासरव उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केली असली हे सारे काही सरळ नाही.
अजित पवारांच्या मृत्यूनंतरचा घटनाक्रम व सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी करण्यात आलेली घाई हे सारे लक्षात घेता पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे या द्वयीने भाजपच्या मदतीने प्रयत्न केले होते हे लपून राहिलेले नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर विलीनीकरणाची चर्चा सुरू झाल्यावर पटेल व तटकरे यांनी विरोधात भूमिका घेतली. ‘विलीनीकरण कोणाचे व कोणाबरोबर, असा प्रश्न तटकरे यांनी उपस्थित केला होता. अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची व विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी आली असली तरी पक्षाची संघटनात्मक सूत्रे पार्थ पवार यांच्याकडे गेली.
भाजपची खेळी ?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा महायुतीचा घटक पक्ष आहे. यामुळे विलीनीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी या पक्षाला भाजपशी चर्चा करावी लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी मांडली होती. यावरून राष्ट्रवादीच्या राजकीय निर्णय प्रक्रियेत भाजपची भूमिका स्पष्ट असेल, असेच फडणवीस यांनी सूचित केले. सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांची नावे नसणे यामागे मोठी खेळी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादीची सूत्रे प्रफुल्ल पटेल यांच्याडे जाऊ नये, अशी भाजपची योजना आहे. यानुसारच निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या पत्रव्यवहारामागे भाजपची भूमिका असल्याचा संशय पक्षात व्यक्त केला जातो. पार्थ पवार हे पुण्यातील जमीन घोटाळ्यात अडकले आहेत. यामुळे त्यांना आता भाजपच्या इशाऱ्यानुसारच पक्षाचा कारभार करावा लागणार आहे, असे एकूण दिसते. प्रफुल्ल पटेल वा तटकरे या दोन ज्येष्ठ नेत्यांचे खच्चीकरण करण्याची ही योजना फक्त सुनेत्रा पवार किंवा त्यांच्या दोन मुलांची नसेल. यामागे नक्कीच मोठी शक्ती असणार हे निश्चित. भाजपच्या इशाऱ्यावरून पक्षाचा कारभार चालेल हे आता स्पष्ट झाले आहे.
पक्षाचे महत्त्व कमी झाले
अजित पवारांच्या पश्चात पक्षाचे अस्तित्वच जाणवत नाही. पक्षाचे नेते व कार्यकर्तेही सैरभैर होऊ लागले आहेत. कोणाकडे दाद मागावी हेच समजेनासे झाले आहे. सुनेत्रा पवार किंवा त्यांचे पुत्र पार्थ यांची पक्षावर वा प्रशासनावर तेवढी पकड नाही. सत्तेत असूनही राजकीयदृष्ट्या पक्षाची ताकद कमी होऊ लागली आहे. अर्थ खाते पुन्हा पक्षाला मिळेल याची काही खात्री आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. विलीनीकरणावरूनही पक्षात एकवाक्यता नाही. पक्षाची ताकद खचल्यास नेतृत्वाच्या अभावी पुन्हा राष्ट्रवादीला उभारी मिळणे कठीण. राज्याच्या सत्तेत पक्ष भागीदार असल्याने नेते व कार्यकर्ते अजून टिकून राहतील. पक्षात अशीच परिस्थिती राहिल्यास राष्ट्रवादीत मोठी फूट अटळ मानली जाते. तसेही प्रादेशिक पक्ष गिळंकृत करून आपली ताकद वाढविण्याचे भाजपचे धोरण आहेच. पश्चिम महाराष्ट्र किंवा सहकार चळवळीतील यशाने भाजपलाही राष्ट्रवादीची तेवढी उपयुक्तता राहिलेली नाही. एकूणच राष्ट्रवादीचे काही खरे नाही.
santosh.pradhan@expressindia.com
