scorecardresearch

विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांचा बिनविरोध विजय

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रज्ञा सातव यांचं अभिनंदन केलं आहे.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत दिवंगत नेते राजीव सातवांच्या पत्नी प्रज्ञा यांचा बिनविरोध विजय

राज्यात सध्या विधान परिषदेची रणधुमाळी आहे. काँग्रेसने दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवार म्हणून घोषित केल्याने या निवडणुकीकडे लक्ष लागून होतं. आमदार शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत.

भाजपाचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रज्ञा सातव बिनविरोध निवडून आल्या आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रज्ञा सातव यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये थोरात म्हणतात, विधानपरिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची खंबीर साथ व विरोधी पक्ष भाजपने आपला उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध केली त्याबद्दल त्यांचे आभार.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. तसंच यावेळी ही निवड बिनविरोधी व्हावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं होतं. काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केलेल्या विनंतीनंतर भाजपाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-11-2021 at 17:36 IST