Praful Patel On Parth Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असून आज सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, यावेळी प्रफुल पटेल यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. पार्थ पवार यांना पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली आहे. प्रफुल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकी दरम्यान केली आहे. त्यामुळे आता पार्थ पवार राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

प्रफुल पटेल काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमिटीने, ज्यामध्ये छगन भुजबळ आहेत, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील आहेत. आम्ही सर्वांनी मिळून एकमताने निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय आम्ही आमच्या पक्षाच्या अध्यक्षांच्या उपस्थित घेऊ इच्छित नव्हतो, त्यामुळे आज या ठिकाणी स्पष्ट करतो की, आता राज्यसभेची जी निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यासाठी ५ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला आहे की पार्थ अजित पवार हे आमच्या पक्षाचे उमेदवार असतील”, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली आहे.

सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत मोठी फेरबदल करण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी व महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एनसीपी) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री पदासह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपदही होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांची या पदावर नियुक्ती होणे निश्चित मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज वरळी डोम येथील सभागृहात पार पडली. यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे प्रफुल पटेल यांनी जाहीर केले.