NCP National President News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झाले होते. या रिक्त पदावर पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी शनिवारी (३१ जानेवारी) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, दुसरीकडे प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे वक्तव्य पीयूष गोयल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केले होते.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा दावा खोडून काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, ‘प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली नाही. या पदासाठी लवकर निवडणूक होईल. पण सध्या या पदावर कोणाचीच निवड करण्यात आली नाही.’

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

माध्यमांत आलेल्या बातम्यांनंतर प्रफुल्ल पटेलांनीही स्पष्टीकरण दिले आहे. पटेल म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या दिसत आहे. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाही पद्धतीने चालतो. पक्षाच्या अध्यक्षाची निवड वरिष्ठ नेतृत्व आणि आमदारांशी सल्लामसलत करून घेतला जाईल. तसेच आमच्या समर्पित पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आणि सर्व पक्ष सदस्यांच्या भावना आणि सामूहिक इच्छेचा आदर करून घेतला हा निर्णय जाईल. राष्ट्रीय अध्यक्ष निवडताना आम्ही स्थापित प्रक्रियेचे पालन करणार आहोत’.

अध्यक्षपदाची निवड कोण करणार?

२८ जानेवारी २०२६ रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. मुंबईहून बारामती येथे निवडणूक प्रचारासाठी जात असताना त्यांचे विमान क्रॅश झाले आणि या भीषण विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शनिवारी (३१ जानेवारी) अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आता पक्षाचे अध्यक्ष कोण असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या एका वक्तव्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली. मात्र, आता स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करून आपण अध्यक्षपदी निवडले गेलो नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पक्षाच्या अध्यक्षपदाची निवड ही पक्षातील वरिष्ठ नेते आणि सर्व कार्यकर्त्यांच्या मतानेच केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय नाही

प्रफुल्ल पटेल यांच्या निवडीबाबत व्हायरल झालेल्या बातमीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राजकीय हेतूने चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याची टीका केली. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पसरवण्याचे काम सुरू आहे. अध्यक्षपदासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नसताना अशा अफवा पसरवणे हे पूर्णपणे राजकीय हेतूने केले जात आहे. जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांनी अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये.”