Praful Patel clarifies NCP’s stand on Ashok Kharat Case : अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील भोंदू अशोक खरातविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याने अनेक महिलांवर त्याच्या कार्यालयात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, या अशोक खरातचे अनेक राजकीय हितसंबंधही समोर आले आहेत. राज्यातील अनेक बडे नेते त्याच्याकडे ज्योतिषी मार्गदर्शनासाठी जात होते, असा दावा केला जातोय. तसंच, यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव समोर आलंय. त्यांचे अनेक फोटोही समोर आले आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याचं सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात यांच्याबरोबर अनेक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्या अशोक खरातच्या पाया पडताना, पाद्यपूजन करताना, छत्री धरताना दिसत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका होत असून त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.
योग्य ती कारवाई करू
प्रफुल पटेल पत्रकार परिषदेत म्हणाले, अशोक खरात प्रकरणी निश्चित कारवाई केली जाणार आहे. या तपासणीतून आणि चौकशीतून ज्यांची नावे समोर येतील त्यांच्यावर तातडीने आणि सक्तीने कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणात अनेक राजकीय लोकांचीही नावे जोडली गेली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून योग्य ती कारवाई करू. येणाऱ्या एक-दोन दिवसांत हे करू.”
अशोक खरात प्रकरण नेमकं काय?
सरकारवाडा पोलीस ठाण्यात महिलेने अशोक खरातविरुध्द दिलेल्या तक्रारीनुसार, स्वतः कडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून मंत्र तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली खरातने विश्वास संपादन केला. यानंतर त्याने कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ खाण्यास दिल्यानंतर अत्याचार केला. २०२२ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता, असे तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे खरात यास ताब्यात घेतले. त्याच्या कार्यालयातील तपासात ५८ आक्षेपार्ह चित्रफिती सापडल्या.
त्याला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात उपस्थित केले असता २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयावर छापा टाकला. या छाप्यात महत्त्वाचे पुरावे आणि काही चित्रफिती सापडल्या. नामांकित महिला, वरिष्ठ अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांची माहिती चित्रफितीत असल्याचे बोलले जाते. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी, खरात याच्याविरुद्ध आतापर्यंत एकाच महिलेने तक्रार दिली असून, आणखी काही महिला तक्रारीसाठी पुढे येऊ शकतात, असे सांगितले.
