Praful Patel On Sunetra Pawar Deputy CM: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात अकाली निधन झालं. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातच नाही तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे आता उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार? अजित पवारांकडे असलेल्या अर्थ खात्यांची जबाबदारी कुणाकडे दिली जाणार? तसेच सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल पटेल, धनंजय मुंडे या सर्वांनी एकत्रित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान राष्ट्रवादीच्या या सर्व नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती सांगितली जात आहे. या चर्चांत नेमकं काय ठरलं? उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे देण्याचं ठरलं? याबाबत प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना मोठं भाष्य केलं. ‘अजित पवार यांच्याकडील खात्यांची जबाबदारी कोणाकडे द्यायची यावर चर्चा झाली. पण आम्ही सगळ्यांच्या भावनांचा विचार करून लवकरच योग्य तो निर्णय घेऊ’, असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

प्रफुल पटेल काय म्हणाले?

“अजित पवार यांच्याकडे जी जबाबदारी होती, त्या जबाबदारीबाबत आम्हाला निर्णय करावा लागणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसांत लवकरात लवकर आम्हाला त्याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांनाही बोलून, त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय आणि तातडीने निर्णय, सर्वांच्या भावनेचा आदर करून घ्यायचा आहे, तसेच अजित पवार यांचं आमच्यासाठी आणि पक्षासाठी जे योगदान होतं, अशा सर्व गोष्टींचा विचार करून आम्हाला त्याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे. हे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे”, असं प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का?

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. यावर उत्तर देताना प्रफुल पटेल म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांच्या नावाची आम्ही काहीही चर्चा केली नाही. मात्र, तो आमच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. कारण कोणाला त्या पदावर बसवायचं? हा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या अंतर्गतचा विषय आहे. पण मी तुम्हाला हे सांगतो की जनभावनेचा विचार करून आणि आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या भावनेचा आणि आमच्या स्वत:च्या भावनेचा विचार करून योग्य तो निर्णय घेऊ. माझी स्वत:ची देखील हिच भावना आहे की आम्ही योग्य तो निर्णय केला पाहिजे. त्या दिशेने आम्ही विचार करत आहोत. कारण अद्यापही राजकीय दुखवटा आहे. त्यामुळे आम्हाला या जबाबदारीच्या अनुषंगाने सुनेत्रा पवार यांच्याशी देखील बोलावं लागेल. आम्ही त्यांच्याशी लवकरच बोलणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेऊ. जनतेच्या भावनेच्या अनुरुपच आमचा निर्णय होणार आहे”, असं प्रफुल पटेल यांनी सांगितलं आहे.