गेल्या काही दिवसांपासून मशिदींवरील भोंग्यांवरून सुरू असलेलं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम राज्य सरकारला दिला असून यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. भोंगे न उतरल्यास मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा दिला असल्याने वाद पेटला आहे. त्यावर बच्चू कडू यांनीही त्यांना एबीपी माझाशी बोलताना इशारा दिला आहे.

“मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे, मला कुणी…”, खासदार नवनीत राणांचा शिवसेनेला इशारा!

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करत हनुमान चालिसा पठणाचं आवाहन केलं आहे. मुख्यमंत्र्यांना देखील आपल्या घरातच हनुमान चालिसा पठण करावं, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला होता. आता नवनीत राणा आणि रवी राणा यांनी येत्या २३ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं निवासस्थान अर्थात मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

राणा दांपत्य रात्रीच मुंबईला रवाना?

राणा दांपत्याला अमरावतीमध्येच रोखण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न आहे. पण राणा दांपत्य अमरावतीत नसल्याने ते रात्रीच मुंबईला निघून गेले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र ते सध्या कुठे आहेत याबाबत कोणाकडेही माहिती नाही.

बच्चू कडूंचा इशारा –

शिवसैनिकांनी राणा दांपत्याला रोखण्याचा इशारा दिलेला असताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहारचे कार्यकर्ते शिवसैनिकांसोबत असतील असं सांगितलं आहे.

“खरं तर अतिशय मूर्खपणा आहे. कोणते मुद्दे घ्यावेत याचं कोणतंही भान राणांना राहिलेलं दिसत नाही. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा सगळा प्रकार सुरु आहे. शिवसेनेने जे आव्हान दिलं आहे त्यामध्ये आम्हीदेखील त्यांच्यासोबत आहोत. प्रहारचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असतील,” असं बच्चू कडू यांनी सागितलं आहे.

“या जिल्ह्याचे ते खासदार, आमदार आहेत. त्यांचा अपमान होऊ नये असं आम्हाला वाटतं. सामान्य माणसाशी संबंध नसलेले मुद्दे घेऊन आपला अपमान कऱण्याच्या सोयीने ते जात आहेत. उलट निवडून येताना राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला आणि आता वेगळ्या विचारधारेचा पाठिंबा घेत आहेत. ही मतदारासोबत फार मोठी बेईमानी आहे,” अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

“ज्या विचारधारेवर निवडून आले ती कायम ठेवली नाही उलट त्यावर आक्रमण करत आहेत. शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या वाटेला गेलात तर काय होईल सांगता येणार नाही,” असा इशारा यावेळी बच्चू कडूंनी दिला आहे. “वाघाची नखं अजूनही धारदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं,” असंही यावेळी ते म्हणाले.