scorecardresearch

अन्… शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच बांधली आपली जनावरे

मंद्रूप ग्रामपंचायत हद्दीत शासनाने एमआयडीसी मंजूर करून भूसंपादन केले आहे. मात्र, अद्याप बाधित शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

अन्… शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच बांधली आपली जनावरे

दक्षिण सोलापूर तालुक्यात मंद्रूप ग्रामपंचायत हद्दीत शासनाने एमआयडीसी मंजूर करून भूसंपादन केले आहे. परंतु बाधित शेतकऱ्यांनी आपणांस विश्वासात न घेता आणि कोणताही मोबदला न देता आपल्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्याचा आरोप करीत त्याविरोधात आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात उडी घेत प्रहार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जनावरे आणून बांधली आहेत.

हेही वाचा- गुजरात विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर कोल्हापुरात भाजपाचा आनंदोत्सव

मंद्रूप परिसरात भाजपाचे आमदार सुभाष देशमुख हे यापूर्वी राज्यात सहकारमंत्री असताना त्यांनी एमआयडीसी मंजूर करून घेतली होती. त्यासाठी भूसंपादनही झाले आहे. परंतु संबंधित बाधित शेतकऱ्यांनी आपणांस विश्वासात न घेताच झाल्याचा आणि कोणताही मोबदला न देताचा भूसंपादन झाल्याचा आरोप केला आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचे बाधित शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रश्नावर गेल्या ८२ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तरीही दखल घेतली जात नसल्यामुळे त्यात प्रहार संघटनेने उडी घेतली आहे. संबंधित २९ शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीच्या जमिनी परत कराव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बाधित शेतकऱ्यांनी जनावरे आणून बांधली आहेत. प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख व शहर प्रमुख अजित कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाल्यानंतर तेथे जनावरांच्या गोठ्याचे स्वरूप आले होते. दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी खर्डा-भाकरी खाऊन ठिय्या मारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:57 IST

संबंधित बातम्या