अहिल्यानगर : राहुरी तालुक्याच्या अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर ‘केके. रेंज’ या युद्धसराव क्षेत्राचे आरक्षण लादले गेले. आता पुन्हा या गावालगतची सुमारे ७ हजार एकरवर युद्धाचा दारूगोळा ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संरक्षण मंत्रालयाला तसे पत्र दिल्याचा गौप्यस्फोट माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज, शुक्रवारी राहूरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या ‘जन आशिर्वाद यात्रे’च्या सभेत बोलताना केला.

माजी राज्यमंत्री तनपुरे यांनी राहुरी पोटनिवडणुकीतील उमेदवारीसाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू केली. बारागाव नांदूर येथून यात्रेस प्रारंभ झाला. सभेच्या अध्यक्षस्थानी साखर कारखान्याचे माजी संचालक पंढरीनाथ पवार होते. यावेळी लखुनाना गाडे, ताराचंद गाडे, जालिंदर गाडे, श्रीराम गाडे, नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, नवाज देशमुख, मच्छिंद्र गाडे, वसंतराव गाडे, ज्ञानेश्वर बाचकर आदी उपस्थित होते.

श्री. तनपुरे म्हणाले, राहुरी मतदारसंघाला कोणी वाली नसल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीवर गंडांतर आले आहे. लोकप्रतिनिधी असता तर आवाज उठविता आला असता. गेल्या निवडणुकीत पराभव झाला त्यास अनेक कारणे आहेत. आता पोटनिवडणूक लागली असून निर्णय घेण्यासाठी यात्रा काढली आहे.

मंत्रीपदाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा दाखला देत तनपुरे म्हणाले, यापूर्वी काम केली नसती तर मतदारसंघात हालाखिची परिस्थिती राहिली असती. मंत्री असताना कोणताही दुजाभाव केला नाही. प्रश्न मार्गी लावण्यासाठी बाहेरील कुणीही आलेले नव्हते. शिर्डी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पासाठी बागायती भागातील जमिनीवर आरक्षण, सुरत हैदराबाद रस्त्यासाठी जाणाऱ्या जमिनी, त्यास मिळणारी तुटपुंजी भरपाई, अशा शेतकऱ्यांवर येऊ घातलेले गंडांतर टाळण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस असणे गरजेचे आहे.

तालुक्याची अस्मिता जपण्यासाठी जागरूक राहावे असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी सरपंच प्रभाकर गाडे, बाळासाहेब गाडे, रामदास बाचकर, एजाज देशमुख, मच्छिंद्र गाडे यांची भाषणे झाली.

सभा संपताच अक्षय कर्डिलेही दाखल

प्राजक्त तनपुरे यांच्या बारागाव नांदूर येथील सभेचा समारोप होताच, त्याचवेळी भाजपचे संभाव्य उमेदवार अक्षय कर्डिले हे सुद्धा बारागाव नांदूर गावात दाखल झाले. योगायोगाने निवडणूकपूर्व प्रारंभीच पाठशिवणीचा खेळ बारागाव नांदूरकरांना पाहण्यास मिळाला. दरम्यान तनपुरे यांच्या यात्रेमुळे निवडणूकपूर्व रंगतही निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

जनता सांगेल तो निर्णय घेऊ

पोटनिवडणूक लढवावी की नाही याची विचारणा करण्यासाठी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात आलो आहे. जनता सांगेल तो निर्णय मान्य असेल. मागील वेळेस विधानसभेत कामकाज करण्याची संधी मिळाली होती, असे सांगत प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवावी की नाही असे उपस्थितीतांना विचारले. उपस्थितांनी निवडणूक लढविण्यास पाठिंबा दर्शविला.