अहिल्यानगर: माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांनी राहुरी मतदारसंघात गेली अनेक वर्षे भाजपविरुद्ध संघर्ष केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही त्यांना प्रामुख्याने भाजपविरुद्धच लढावे लागणार आहे. त्यामुळे तनपुरे यांच्या ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्येही द्विधा मनःस्थितीत निर्माण झाल्याचे समजले. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवायची नाही मात्र त्यांना पाठिंबाही जाहीर करायचा नाही अशा तनपुरे यांच्या दुहेरी भूमिकेतून समर्थकांमध्ये दोलायमानता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल, सोमवारी राहुरीत प्रचारसभा झाली. या सभेपूर्वी प्राजक्त तनपुरे पोटनिवडणुकीतील आपली भूमिका जाहीर करतील, अशी चर्चा होती. त्या दृष्टीने त्यांनी सकाळपासूनच आपल्या समर्थकांच्या भेटी घेत त्यांची मते जाणून घेण्यास सुरुवात केली होती. रात्री उशिरापर्यंत समर्थकांच्या भेटीगाठी सुरूच होत्या. मुख्यमंत्री फडणवीस सभा आटोपून निघून गेले. मात्र तनपुरे यांनी भूमिका जाहीर केली नाही.

तनपुरे यांनी समर्थकांशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे बंद खोलीत समर्थकांना काय कानमंत्र दिला याची बाहेर वाच्यता झाली नाही. काही समर्थकांशी संपर्क केला असता त्यांनी यापूर्वीच्या अनेक निवडणुकातून आम्ही भाजपविरुद्ध संघर्ष केला, लोकसभा व विधानसभा या नेत्यांच्या निवडणुका असल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातूनही भाजपविरुद्ध संघर्ष करावा लागला. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकातूनही आम्हाला भाजपविरुद्धच संघर्ष करावा लागणार आहे, अशी भूमिका मांडली जात होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संपर्काला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय घेतला. एका अर्थाने भाजपला अनुकूल अशीच भूमिका त्यांनी घेतली. मात्र दुसरीकडे भाजपला जाहीर पाठिंबा देणे टाळले. पोटनिवडणूक असल्याने व राहुरी मतदारसंघाच्या विकासाच्या प्रश्नांवर आपण भाजप उमेदवाराविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, असे ते सांगतात. मात्र त्याचबरोबर दुसरीकडे तनपुरे चौकशीच्या फेऱ्यातही अडकलेले आहेत. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही.

राहुरीमध्ये तनपुरे कुटुंबीयांना मानणाऱ्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ते पोटनिवडणुकीत कोणती सूचना देतात, याकडे समर्थकांचे लक्ष होते. तनपुरे यांच्या ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांना पोटनिवडणुकीत मोकळीक मिळणार असली तरी त्यांच्या पुढे द्विधा मनस्थितीही निर्माण झाली आहे. तनपुरे समर्थकांनी यापूर्वी वेळोवेळीच्या निवडणुकांमधून भाजपविरुद्ध संघर्ष केला ,जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकातूनही तनपुरे समर्थकांना भाजप विरुद्ध लढावे लागणार आहे. अशा परिस्थितीमुळेच तनपुरे समर्थकांपुढे व्दिधा परिस्थिती निर्माण झाली आहे.

निवडणुकीपूर्वी तनपुरे यांनी भगवी टोपी, भगवे उपरणं परिधान करून संपर्क यात्रा सुरू केली होती. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर आहेत काय असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. प्रत्यक्षात त्यांनी काल आपण राष्ट्रवादीमध्येच आहोत, असे प्रसारमाध्यमांना सांगितले.

तनपुरे समर्थक भाजपबरोबर- राधाकृष्ण विखे

प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी दाखल न करता भाजपला अनुकूल भूमिका घेतली, मात्र त्यांनी प्रत्यक्ष पाठिंबा दिलेला नाही, याकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे लक्ष वेधले असता विखे म्हणाले, त्यांच्या पाठिंबाची आवश्यकता नाही. त्यांनी अर्ज दाखल केला नाही म्हणजेच पाठिंबा दिलेला आहे. राहुरीत वेगळ्या प्रसंगातून पोटनिवडणूक होत आहे. तनपुरे यांचे कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत. त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली नाही. प्राजक्त तनपुरे यांचे चुलते मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यासपीठावर उपस्थित होते.