मुंबई : राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासकीय योजनांच्या निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास अतिरिक्त रक्कम राखीव निधीतून (कॉर्पस फंड) उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाच्या मोहिमेला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच झाली. या बैठकीत अवयव प्रत्यारोपणासह विविध अत्याधुनिक उपचार सुविधा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
रुबी हॉल क्लिनिकमध्ये हृदयविषयक आजार आणि कर्करोग उपचारांची सुविधा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. खासगी रुग्णालये आणि शासकीय आरोग्य योजनांमध्ये प्रभावी समन्वय साधून रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा देण्याच्या सूचना आबिटकर यांनी दिल्या.
पश्चिम महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील सीमावर्ती भागातील तसेच ग्रामीण रुग्णांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे रुबी हॉल क्लिनिकच्या माध्यमातून सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्याचे नियोजन आहे. येथे सीटी स्कॅन, एक्स-रे, ईसीजी, टू-डी इको आणि यूएसजी यांसारख्या तपासण्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे रुग्णांना पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज भासणार नाही. राज्यात प्रोटॉन थेरपीची सुविधा सध्या मुंबईतच उपलब्ध असल्याने पुण्यात कमी खर्चात ही अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. रुबी हॉल क्लिनिक आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प पुढे घेऊन जाणार आहे.
