Prakash Ambedkar On Girish Mahajan : नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्यामुळे वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी आक्षेप नोंदवत जाब विचारला. ‘मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव का घेतलं नाही?’ असा सवाल माधवी जाधव यांनी विचारला. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.
त्यानंतर अखेर गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. या संपूर्ण घटनेवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्याशी संवादही साधला. ‘मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे’, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडू, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
“आज नाशिकमध्ये भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव (वनरक्षक) महिलेसोबत फोनवर बोललो. यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला सांगितला. मंत्री गिरीश महाजन यांचं कृत्य अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणारा गुन्हा आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल. आरएसएस-भाजपाकडून सातत्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय. भाजपा आणि गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार यांनी काय म्हटलं?
“प्रजासत्ताक दिनीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा विसर मंत्र्यांना पडत असेल तर याहून मोठं दुर्देव काय असू शकतं? भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान अमुल्य असून एखाद्या मंत्र्याच्या भाषणातील अनुल्लेखाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान पुसता येणारं नाही. नाशिकमध्ये घडलेली घटना नकळत झाल्याचं मान्य करत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेणं गरजेचं आहे. संबंधित महिला अधिकारी यांनी व्यक्त केलेली भावना अतिशय योग्य आणि भारतीय प्रजासत्ताकाविषयी प्रेम दर्शवणारी असून त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कुठलीही कारवाई होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी”, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
गिरीश महाजनांनी व्यक्त केली दिलगिरी
“एखादं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर एवढा गोंधळ कशासाठी घालायचा? मी जाणीवूपर्वक अर्वाच्च किंवा उलट सुलट बोललो नव्हतो. पण नाव राहिलं म्हणून एवढा गोंधळ घालायची गरज नव्हती. नाव राहिलं म्हणून मी तत्काळ दिलगिरी व्यक्त केली. पण मी खरंच सामाजिक समरसता जोपासणारा माणूस आहे, मी बाबासाहेबांचा अनुयायी आहे. त्यांचा विचार जोपासणारा माणूस आहे. मला वाटतं यावर हा विषय थांबवला पाहिजे होता. पण अॅट्रोसिटी दाखल करा असं म्हणणं चुकीचं आहे”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे.
