Premium

“मीच भुजबळांना तुरुंगातून बाहेर काढलं”, प्रकाश आंबेडकरांचा दावा; म्हणाले, “मी त्या न्यायाधीशाला…”

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, न्यायाधीश त्यावेळी भुजबळांना तुरुंगाबाहेर सोडत नव्हते.

Prakash Ambedkar Chhagan Bhujbal
प्रकाश आंबेडकर यांचं छगन भुजबळांबद्दल मोठं वक्तव्य.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी दोन वर्ष तुरुंगवास भोगला आहे. दिल्लीतलं महाराष्ट्र सदन बांधताना मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी न्यायालयाने १४ मार्च २०१६ रोजी भुजबळ यांची तुरुंगात रवानगी केली होती. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात काढली. तुरुंगात असताना त्यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर काही महिने त्यांच्यावर मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. याचदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन भुजबळ घरी परतले. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दावा केला आहे की, त्यांनीच भुजबळांना तुरुंगाबाहेर काढलं. प्रकाश आंबेडकर मंगळवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातल्या फुले वाड्यात जाऊन त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी ओबीसी आरक्षणावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, छगन भुजबळांची भूमिका मंडल आयोगाच्या विरोधात होती. म्हणून मी तुम्हाला (पत्रकार) सांगतोय की आधी इतिहास शोधा आणि तो लोकांसमोर आणा.

प्रकाश आंबेडकर यांच्या संविधान सन्मान महासभेतील वक्तव्यानंतर छगन भुजबळ प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की माझी प्रकाश आंबेडकरांबद्दल नाराजी नाही. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, माझीही त्यांच्याबद्दल नाराजी नाही. उलट त्यांना तुरुंगातून बाहेर काढणारा मीच आहे. मी त्या न्यायाधीशाला शिव्या घातल्या नसत्या तर आज छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आले नसते. माझी भुजबळांवर नाराजी असती तर मी सार्वजनिकरित्या त्या न्यायाधीशाला (सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भुजबळांना तुरुंगातून सोडून देण्याबाबतचा निर्णय घेण्यास दिरंगाई करणारे न्यायाधीश) शिव्या घातल्या नसत्या.

हे ही वाचा >> “मीच ओबीसी लढ्याचा जनक”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य, मंडल आयोगाचा उल्लेख करत म्हणाले…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले, ते न्यायाधीश त्यावेळी भुजबळांना तुरुंगाबाहेर सोडत नव्हते. न्यायपालिका त्यांचा जामीन नाकारत होती. त्यावेळी मीच उलटा वार केला होता. न्यायपालिका जर व्यवस्थित वागली नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही भुजबळांबद्दलचा निर्णय घेतला नाही तर संबंधित न्यायाधीशावर खटला चालवता येऊ शकतो, हे लक्षात घ्यावं असं मीच बजावलं होतं. त्याच्या पुढच्या दिवशी भुजबळांना सोडून देण्यात आलं. परंतु, भजबळ यांनी कधीच माझे आभार मानले नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar says i had taken chhagan bhujbal out of jail maharashtra sadan scam asc

First published on: 28-11-2023 at 16:49 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा