शिवसेना पक्ष फुटल्यापासून दोन्ही गटांबाबत (एकनाथ शिंदेंचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट) वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. खरी शिवसेना कोणाची याबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद चालू होता तेव्हापासून अधून-मधून राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होत आहे. राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अधून मधून राज ठाकरेंची भेटत असतात. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएतील प्रमुख नेते अमित शाहांची भेट घेतली होती. पाठोपाठ मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. दरम्यान, पुन्हा एकदा राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी नेहमीच “असं काही होणार नाही, मी माझा पक्ष सांभाळेन, मला माझी स्वतःची मुलं कडेवर घेऊन फिरायचं आहे”, अशा प्रकारची उत्तरं देत आहेत. मात्र राज यांच्याबद्दलची चर्चा थांबलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले, “नजिकच्या काळात राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात.” यावेळी आंबेडकर यांनी वेगवेगळ्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. आंबेडकर म्हणाले, “या लोकसभा निवडणुकीत आम्ही शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला मात्र सध्याच्या टप्प्यात तो अपयशी झाला आहे.” त्यानंतर आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं भवितव्य काय? यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “याबद्दल मी काही बोललो तर तुम्ही म्हणाल की मी खूप मोठं वक्तव्य केलं आहे.”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मला कुठेतरी असं जाणवू लागलं आहे की नजिकच्या काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अध्यक्ष होतील. सध्या तसं चित्र दिसू लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्य नेतेपद निर्माण करण्यात आलं आहे. म्हणूनच मी म्हणेन की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन केली जाईल. राज ठाकरे हे त्या शिवसेनेचे प्रमुख होतील. मला तशी शक्यता दिसत आहे. मला स्वतःलाही त्याबद्दल थोडी उत्सुकता आहे.”

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा प्रयोग पुन्हा होईल का? असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले. भाजपाने या निवडणुकीत जी योजना आखली आहे त्याकडे आपण थोडं गांभीर्याने बघितलं पाहिजे, असं मला वाटतं. मी स्वतः देखील त्याकडे पाहतोय. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंबाबत थोडी मवाळ भूमिका घेतली आहे. ते म्हणालेत उद्धव ठाकरेंची परिस्थिती वाईट झाली तर आम्ही त्यांना मदत करू. म्हणजेच एक प्रकारे मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना गाजर दाखवलं आहे. दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आणि भाजपाच्या प्रचारात आणून मोदी यांनी एक वेगळा प्रयोग केलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच मुख्य नोंदणीकृत शिवसेना राज ठाकरेंकडे देण्याचा घाट घातला नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा स्थितीत दोन्ही ठाकरे राजकारणात तग धरण्यासाठी संघर्ष करताना दिसतील.

“दोन्ही ठाकरेंमध्ये राजकारणात तग धरण्यासाठी संघर्ष होईल”

हे ही वाचा >> “राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”, शरद पवारांचा टोला, ‘त्या’ टीकेवर दोन वाक्यात प्रत्युत्तर

वंचितचे अध्यक्ष म्हणाले, यापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात इंडिकेट-सिंडिकेट काँग्रेसमधील वाद आपण पाहिला आहे. त्यामध्ये इंदिरा गांधींची काँग्रेस वाचली. अशा स्थितीत राज ठाकरे भविष्यात नोंदणीकृत शिवसेनेचे अध्यक्ष होतील असं आपण समजूया. तसं झाल्यास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात तग धरण्यासाठी संघर्ष करताना दिसतील. आता या दोघांच्या चुरशीत कोण जिंकणार हा प्रश्न आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar says raj thackeray can become eknath shinde led shivsena chief asc