मुंबई : प्रजासत्ताक दिनी मंत्र्यांने भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख टाळणे, हा ‘अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यां’तर्गत (ॲट्रॉसीटी) गुन्हा होतो, त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या नाशिक येथील शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमातील वर्तणुकीबाबत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी ‘वंचित बहुजन आघाडी’चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

मंत्री महाजन यांना कुणी भाषण लिहून दिले असेल तर सदर व्यक्तीवर सुद्धा कारवाई करायला हवी. मंत्री महाजन अनवधानाने चूक घडली असे म्हणतात, मग त्यांचे मंत्रीपद सुद्धा अनवधानाने काढून घ्यायला हरकत नाही. ज्या दिवशी भारतीय प्रजासत्ताक संविधानाचा स्वीकार केला, त्या दिनानिमित्तच्या कार्यक्रमात संविधान निर्मात्याचा नामोल्लेख टाळणे हा गंभीर अपराध आहे . राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांचे बाबासाहेबांविषयी प्रेम तोंडदेखले असून, त्यांनी कायम बाबासाहेबांचा व त्यांच्या विचारांचा विरोध केला आहे, अस आरोप ॲड. आंबेडकरांनी केला.

वंचित बहुजन आघाडीची नाशिक पश्चिम समिती मंत्री महाजन यांच्यावर ॲट्रॉसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र पोलीसांनी गुन्हा नोंद न केल्यास मी स्वत: त्याचा कायदेशीर मसुदा तयार करुन न्यायालयात दाद मागणार आहे, असे आंबेडकर यांनी सांगितले.

मंत्री महाजन यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन होत आहेत, ती आंबेडकरी समाजातून उमटलेली उत्स्फुर्त प्रतिक्रिया आहे. मंत्री गिरीश महाजन यांची हरकत चव्हाट्यावर आणणाऱ्या वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांच्या धाडसाचे कौतुक आहे. मी त्यांच्याशी फोनवर बोललो आहे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.

भाजपची जातीयवादी मानसिकता स्पष्ट  : 

प्रजासत्ताक दिन हा संविधानाचा उत्सव आहे. संविधानाच्या निर्मात्यांना प्रजासत्तादिनी विसरणे ही भाजपची महाराष्ट्रविरोधी आणि जातीयवादी मानसिकता दर्शवते, असा आरोप काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.

भाजपा कायम मनुवादी राहिला :

एका बाजुला आणिबाणीविरोधात तुरुंगात गेलेल्यांचा महायुती राज्य सरकार सत्कार करते, दुसरीकडे संविधान निर्मात्यांचा अपमान करते. भाजपा कायम मनुवादी राहिली आहे. भाजपचा खरा चेहरा समोर आला, असे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

जोडे मारा आंदोलन : नाशिकमध्ये सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणाच्या दरम्यान न घेतल्यासंदर्भात जाहीर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मंत्री महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली. मात्र त्यांच्या वर्तनाबाबत महाजन यांच्यावर समाज माध्यमावर सडकून टीका होत आहे.  राज्यात अनेक ठिकाणी विविध आंबेडकरी संघटनांनी महाजन यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन केले.