Premium

“महाविकास आघाडीत बापात बाप नाही, अन्…” प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“महाविकास आघाडीस आम्हाला बाहेर ठेवायचं आहे. ठिकाय बाहेर ठेवा, पण…”, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

Prakash-Ambedkar-Ajit-pawar
प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया

वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्यावतीने कुर्ला येथे सत्ता परिवर्तन सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “सध्याच्या ब्लॅकमेलिंगच्या राजकारणात महाविकास आघाडी एकत्र राहिल, असं वाटत नाही. कुठल्या तरी कारणाने भांडणे होऊन खेळखंडोबा होईल. यातून जमले नाही म्हणून वेगळे गेलो सांगायचं,” असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाविकास आघाडीस आम्हाला बाहेर ठेवायचं आहे. ठिकाय बाहेर ठेवा, फरक पडत नाही. पण, तुमच्यात तरी जागावाटप करा. लोकसभेच्या ४८ जागांचं वाटप करण्यासाठी आधी चर्चा तर करा… मात्र, महाविकास आघाडीत बापात बाप नाही, लेकात लेक नाही, अशी परिस्थिती आहे. १६ आमदार अपात्र झाले, तर ४० जण आणखी प्रवेश करण्यास तयार आहेत,” असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

हेही वाचा : माथाडी नेते आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिवसेनेत प्रवेश

“…तेव्हा आम्हाला दुर्दैवाने यश आलं नाही”

यावर रविवारी ( ४ जून ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांना नागपुरात प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांची आमच्याबद्दल असणारी मते, आजची नाहीत. मागच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित अशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आम्हाला दुर्दैवाने यश आलं नाही. त्यांचं आमच्या पक्षाबद्दल वेगळं मत आहे, हे प्रकार्षाने जाणवलं आहे.”

हेही वाचा : संजय राऊतांनी अजित पवारांवर केलेल्या ‘त्या’ विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण…”

“…तसा कोणातीही प्रस्ताव आमच्याकडं नाही”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर भाष्य केलं आहे. “प्रकाश आंबेडकर आणि महाविकास आघाडीचा आता काही संबंध नाही. तसा कोणातीही प्रस्ताव आमच्याकडं नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्यावर काहीही बोलणार नाही. त्यांनी काय बोलावं, हा त्यांचा प्रश्न आहे,” असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar slams mahavikas aghadi over loksabha election ssa