नगर: ‘बापात बाप नाही अन् लेकात लेक नाही’ अशी महाविकास आघाडीची अवस्था आहे. मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अनेकजण बघत आहेत. त्याऐवजी आघाडीने जागा वाटपावर लक्ष केंद्रित करावे, खुद्द शरद पवार महाविकास आघाडीतील जागावाटप पुढे सरकत नसल्याची खंत व्यक्त करतात, परंतु हा विषय भिजत ठेवायचा आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांची चर्चा करायची हा एक ‘गेम’ सुरू आहे, त्यामागे ज्यांची चौकशी सुरू आहे तेच मुख्यमंत्रिपदाचे दावेदार दिसत आहेत, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नगरमध्ये लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेवगाव येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांनी आज, सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांना राजकीय दुश्मनीतून गुन्ह्यात गोवण्यात आले, घटनेच्या दिवशी ते औरंगाबादमधील कार्यक्रमात होते, हे आपण पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अ‍ॅड. दीपक शामदिरे, विष्णू जाधव, प्रभाकर बकले, नितीन सोनवणे, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, कुणाल सरोदे, प्रतीक बारसे, योगेश साठे आदी उपस्थित होते. त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. अहमदनगरला अहल्यानगर नाव देण्यात गैर काहीच नाही, अहल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव जिल्ह्यात आहे. होळकर घराण्याचे राज्य त्यांनी पुढे चालवले. परंतु त्यांच्या प्रशासकीय व लष्करी कौशल्याची चर्चा होत नाही तर त्या देवभोळय़ा होत्या असे चित्र निर्माण करणे त्यांच्यावर अन्यायकारक आहे असे मला वाटते.

वातावरण खराब करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत ३५ हजार महिला गायब झाल्या आहेत. परंतु त्यांच्यावर राजकारण सुरू आहे. त्या सर्व लव जिहादद्वारे गायब झाल्याचा प्रचार सुरू आहे. प्रेम नैसर्गिक आहे, हे प्रथम मान्य केले पाहिजे. त्याला लव जिहाद नाव देऊन वातावरण खराब करणे योग्य नाही. दोघांतील संमतीवर बोट ठेवण्याचा अधिकार इतरांना नाही, असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar target maha vikas aghadi over race for chief minister post zws
First published on: 06-06-2023 at 04:59 IST