मुंबई – महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर, आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांबाबत विरोधी पक्षांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. ईव्हीएम (EVM) आणि मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीमुळे लोकशाही धोक्यात असल्याचा दावा त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे केला आहे.

आकडेवारीतील संशयास्पद वाढ?

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मतदान संपल्यानंतर तब्बल ७६ लाख मतांची वाढ दिसून आली. तसेच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती डॉ. परकला प्रभाकर यांचा दाखला देत त्यांनी आंध्र प्रदेशातील निकालांवरही संशय व्यक्त केला. आंध्र प्रदेशात रात्री ९ ते पहाटे २ वाजेपर्यंत मतदान सुरू होते, हे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

पुढील राज्यांसाठी धोक्याची घंटा

महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील ‘पॅटर्न’ इतर राज्यांतही राबवला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत आंबेडकरांनी तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांना इशारा दिला आहे. त्यांच्या मते, विधानसभा निकालात फेरफार झाल्यास खालीलप्रमाणे चित्र दिसू शकते –

तामिळनाडू – २३४ जागांपैकी AIDMK १५० आणि भाजप २५ जागा जिंकू शकते, ज्यामुळे स्टॅलिन, काँग्रेस आणि विजय यांच्या पक्षांना मोठा फटका बसेल.
पश्चिम बंगाल – २९४ पैकी १८०-२०० जागा भाजप जिंकू शकते.
आसाम – १२६ पैकी ९०-९२ जागांवर भाजपचा विजय होऊ शकतो.
केरळ – भाजप किमान १५ जागांवर खाते उघडू शकते.
पांडचेरी – १० जागा भाजप आणि १० जागा त्यांचे मित्र पक्ष जिंकू शकतात.

रिटर्निंग ऑफिसरना तंबी देण्याचे आवाहन

“हा लोकशाहीचा खून रोखायचा असेल, तर ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आताच सावध व्हावे,” असे आंबेडकर म्हणाले. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर (Returning Officer) बारीक लक्ष ठेवून, त्यांना कायद्यानुसार काम करण्याची तंबी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. जर विरोधी पक्षांनी आताच दक्षता घेतली नाही, तर जनमतापेक्षा ‘मशीनचा कौल’ वेगळा लागू शकतो, असा गंभीर इशाराही त्यांनी दिला आहे.

सध्या तमिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पांडचेरी या राज्यांमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते, कारण येथील निकाल देशाच्या राजकारणाची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
या पार्श्वभूमीवर, विधानसभा निवडणुकांच्या संदर्भात निवडणूक निकालांत फेरफार होण्याची शक्यता नमूद केली. हि शक्यता कितपत खरी ठरेल हे पाहणे आता महत्वाचे ठरेल.