गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असं विधान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. त्यावर पंकजा मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. आता गोपीनाथ मुंडे यांचे मेहुणे आणि शिवसेना नेते प्रकाश महाजन यांनी पृथ्वीराज चव्हाण हे अर्धसत्य सांगत आहेत असं म्हटलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले होते?
“गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार होते, त्यांना मंत्रिपद देण्याची मागणी होती. त्यानुसार, सगळं ठरलं होतं पण ऐनवेळी त्यांचा पक्षप्रवेश नाकारण्यात आला.” याबाबत प्रश्न विचारला असता प्रकाश महाजन यांनी उत्तर दिलं आहे.
प्रकाश महाजन नेमकं काय म्हणाले?
गोपीनाथ मुंडे भाजपात नाराज होते हे तर काही लपून राहिलेलं नाही. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चाही तेव्हा झाल्या होत्या हे देखील लपून राहिलेलं नाही. पण गोपीनाथरावांचा काँग्रेस प्रवेश होऊ नये यासाठी गोपीनाथ मुंडेंचे राजकीय मित्र, काँग्रेसमधले मित्र सगळेच प्रयत्न करत होते. सगळ्यांना गोपीनाथ मुंडेंचा ऑरा काय होता ते माहीत होतं. पृथ्वीराज चव्हाण हे पंतप्रधान कार्यालयात कार्यरत होते. सोनिया गांधी यांनी जर गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाला संमती दिली होती तर मनमोहन सिंग कसं काय अडवू शकले? हे मला कळलं नाही. परदेशातून आलेल्या पंतप्रधानांना शेक हँड करण्याची संमतीही मनमोहन सिंग यांना नव्हती. मग सोनिया गांधींनी परवानगी दिल्यावर गोपीनाथ मुंडेंचा प्रवेश अडवतील असं मला वाटत नाही. असं उत्तर प्रकाश महाजन यांनी दिलं आहे. प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
विलासराव आणि गोपीनाथराव यांची मैत्री होती पण…
विलासराव आणि गोपीनाथराव यांची मैत्री होती. पण विलासराव देशमुखांना हे वाटत होतं की गोपीनाथ मुंडे पक्षात आले तर त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचं वागणं हे त्यांना कदाचित थोडं मागे टाकणारं ठरलं असतं. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेतली होती. माझी माहिती अशी होती की वंजारा समाजातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विचारलं होतं की गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये गेले तर काय होईल तर तुकाराम कायंदेंनी सांगितलं होतं की ९० टक्के समाज त्यांच्याबरोबर जाऊ शकतो. त्यानंतर शरद पवारांनीही गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाऊ नये यासाठीच प्रयत्न केले. मग शरद पवार आणि विलासराव देशमुख यांना हे वाटत नव्हतं की गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जावं. काँग्रेसला एक चांगला नेता मिळेल असं वाटलं होतं. शिवाय आत्ता जे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की गोपीनाथ मुंडे हे लोकसभेत उपनेते आहेत, त्यांना मंत्रिपद दिलं तर लाच दिल्यासारखं होईल वगैरे अडचणी यासाठी काँग्रेसमधल्या लोकांनी प्रयत्न केलं.
