मुंबई : महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पण अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत त्याचा उल्लेखही नव्हता. मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून भाजपाला देशाचे विभाजन करायचे होते. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. पण त्यांचा कुटील डाव काँग्रेससह विरोधकांनी हाणून पाडला, या शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिप्पणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या खुल्या चर्चेला काँग्रेस तयार आहे, कधी व कुठे यायचे ते सांगा, असे प्रतिआव्हान काँग्रेसने दिले आहे.

टिळक भवन येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार प्रणिती शिंदे व शोभा बच्छाव यांनी महिला आरक्षण विधेयकासंबंधी भाजपच्या आरोपांना उत्तरे दिली. २०२३ मध्येच महिला आरक्षण विधेयक मंजूर झालेले आहे. पण भाजपा सरकारने त्यात जनगणना व मतदारसंघ पुनर्रचनेच्या दोन अटी टाकल्या होत्या. या अटी न ठेवता लोकसभेच्या ५४३ जागांमधूनच ३३ टक्के आरक्षण द्यावे, अशी काँग्रेसची मागणी होती.

पण भाजपचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा डाव होता. त्यातून दक्षिणेतील राज्य व उत्तरेतील राज्ये यांच्यात उभी फूट पडली असती. इंडिया आघाडी महिला विरोधी आहे हे त्यांना दाखवायचे होते. पश्चिम बंगाल व तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी हा कट होता, पण तो त्यांच्यावरच उलटला, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.

‘महिला विधेयकाला विरोध करून काँग्रेसने भ्रूणहत्या केली’, या पंतप्रधानांच्या आरोपांना उत्तर देताना शिंदे म्हणाल्या, मणिपूरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार, हाथरस, उन्नाव, बदलापूर, खरात प्रकरण हे भाजपाच्या काळातच झाले, ही प्रकरणे भाजपाने कशी हाताळली हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या चारित्र्याचे हनन करण्याचे पाप भाजप रोज करत आहे. भाजपा व रा. स्व. संघात महिलांना किती सन्मान आहे हे सांगण्याची गरज नाही. आजपर्यंत एकही महिला भाजपची अध्यक्षा झाली नाही, याचे उत्तर दिले पाहिजे, असे खासदार शिंदे म्हणाल्या.

महिला आरक्षणाचे प्रणेते राजीव : शोभा बच्छाव

तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पंचायत राज विधेयक आणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण दिले. सोनिया गांधी यांनी ते ५० टक्क्यापर्यंत वाढवले. यासाठी काँग्रेसने कोणत्याही अटी टाकल्या नव्हत्या. महिला आरक्षण विधेयक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी लागू केले असते तर ५४३ जागांमध्ये १८० महिला खासदार दिसल्या असत्या. भाजपा महिला विरोधी आहे, हे सिद्ध झाले असून भाजपा तोंडावर पडली आहे, असे खासदार शोभा बच्छाव यांनी सांगितले.