prasad lad apologies after shivaji maharaj birth konkan statement ssa 97 | Loksatta

‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…

प्रसाद लाड म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस…”

‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…
प्रसाद लाड ( फेसबूक छायाचित्र )

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब विधान केलं आहे.

काल ( ३ नोव्हेंबर ) मुंबईत कोकण महोत्सव पार पडला. या महोत्सवात बोलताना प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं म्हटलं होतं. प्रसाद लाड यांचा हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वीट केला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत.

हेही वाचा : भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”

काय म्हणाले होते प्रसाद लाड?

कोकण महोत्सवात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले. रायगडावर स्वराज्याची शपथ घेतली,” असे प्रसाद लाड यांनी म्हटलं.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसाद लाड यांना लक्ष्य करत भाजपावर टीका केली. “भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या,” असा सल्ला राष्ट्रवादीने दिला.

हेही वाचा : “शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?, करारा जबाब मिलेगा”; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल!

प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसाद लाड यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 14:05 IST
Next Story
“शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातच झाला हे तरी या उपटसूंभ लोकांना मान्य आहे काय?, करारा जबाब मिलेगा”; राऊतांचा भाजपावर हल्लाबोल!