मुंबई : राजकीय रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध असलेले आणि बिहारमधील जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार प्रशांत किशोर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आधार बनण्याची चर्चा सुरु आहे. गुरुवारी सकाळी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याशी प्रशांत किशाेर यांची प्रदीर्घ चर्चा झाली. किशोर हे यापुढे राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार असतील, असे पक्षात बोलले जात आहे.

अजित पवार यांनी पक्षफुटीनंतर नरेश अरोरा यांच्या ‘डीझाईन बॉक्स’ कंपनीला पक्ष प्रसिद्धीचे काम दिले होते. सुनेत्रा पवार पक्षाध्यक्ष होताच ‘डीझाईन बॉक्स’ची हकालपट्टी झाली. गेल्या चार महिन्यात पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्याने पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. पक्षनेतृत्वाला कोणतीही नवी मोहीम राबवता आलेली नाही. पक्षातील आमदारांमध्ये नेतृत्वाविषयी संभ्रम आहे. त्यामुळे पक्षाची छबी सुधारण्यासाठी राष्ट्रवादीला राजकीय रणनितीकाराची गरज वाटते आहे. गेली काही महिने याचा पार्थ पवार यांच्याकडून शोध चालू होता.

प्रशांत किशोर यांनी २०२१ मध्ये राजकीय रणनितीकार म्हणून निवृत्ती जाहीर केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ते सल्लागार असतीलच असे नाही, असे पक्षातून सांगण्यात येते. प्रशांत किशोर हे मागच्या आठवड्यात झालेल्या बिहारमधील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. विजयानंतर किशोर यांनी तातडीने मुंबईला येऊन सुनेत्रा आणि पार्थ पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. त्यामुळे या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.