राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्याबरोबर गुरुवारी प्रशांत किशोर यांची एक महत्वाची बैठक झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे प्रशांत किशोर हे आता राष्ट्रवादीचे नवे राजकीय सल्लागार आहेत का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना महत्वाचं भाष्य केलं आहे. मात्र, प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे की नाही? याबाबत सुनील तटकरे हे अनभिज्ञ असल्याचं समोर आलं आहे. ‘प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करत आहेत याची मला माहिती नाही, त्यांची अधिकृत नियुक्ती झाली असती तर मला निश्चित माहिती झाली असती’, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे.

सुनील तटकरे काय म्हणाले?

“आम्ही सर्वजण फिल्डवर काम करणारे आहोत, मी माझ्या आयुष्यात कधी निवडणुकीचा सर्व्हे केलेला नाही. लोकसभेच्या निवडणुकीवेळी सर्वजण दाखवत होते की आम्ही रायगड लोकसभा मतदारसंघात पराभूत होणार. मात्र, मला अशा रणनीतिकार किंवा असल्या सर्व्हेची गरज नाही. कारण मी फिल्डवर काम करणारा माणूस आहे आणि फिल्डवरवर काम करत असल्यामुळे आपल्याला लगेच कळतं”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

“एखाद्या गावात गेल्यानंतर तेथे लोक भेटल्यावर त्यांना काय वाटतं? तरुणांना भेटल्यावर त्यांना काय वाटतं? याचे सगळे अनुभव येतात. शरद पवार आणि अजित पवार या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे. मी महाराष्ट्र आठ वेळा पालथा घातलाय. राज्यातील चांदा ते बांदा मी सांगू शकतो. त्यामुळे मला काही चिंता असण्याचं कारण नाही. मला रणनितीकार किंवा सर्व्हेची गरज नाही, हे मी माझ्या स्वत:चं सांगत आहे. यातून पुन्हा गैरसमज निर्माण व्हायचे”, असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे सल्लागार आहेत का?

“आता राजकीय रणनीतिकार जे आहेत, त्यांनी त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्ये जपलेलं आहे. मात्र, ते आमच्या पक्षासाठी काम करतात की नाही? हे मला ज्ञात नाही. सुनेत्रा पवार यांची आणि प्रशांत किशोर यांची भेट झालेली आहे. एक ते दीड महिन्यांपूर्वी त्यांची आणि आमची एकत्रितपणे भेट झाली होती. त्यामुळे हा भाग वेगळा झाला. मात्र, आम्ही आमच्या पक्षाचं संघटन राज्यात उभं करत असताना आम्ही सर्वजण नेहमी फिल्डवरवर काम करत असल्यामुळे जनतेला, तरुणांना, शेतकऱ्यांना, उद्योजकांना नेमकं काय हवंय? याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही त्या पद्धतीने पक्षाची बांधणी करत आहोत”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

“सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांची केवळ सदिच्छा भेट झाली, म्हणजे लगेच त्यांना राष्ट्रवादीचा सल्लागार म्हणून नेमलं असा अर्थ काढणं चुकीचं आहे. ६ ते ७ तास भेट झाली, असं तुम्ही म्हणत आहात. तसेच त्या बैठकीत खासदार पार्थ पवार हे देखील होते, असं मी माध्यमांमधून ऐकलं. त्यामुळे याबाबत पार्थ पवारच स्पष्टपणे सांगू शकतील. मला असं वाटतंय की फक्त भेट झाली म्हणून लगेच पक्षाच्या रणनीतिकार म्हणून त्यांना नेमलं असं होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर एनडीएमध्ये काम करत आहोत. त्यामुळे पुढच्या कालावधीत देखील राष्ट्रवादी पक्ष एनडीएबरोबर काम करत राहणार, अशी आमची भूमिका स्पष्ट आहे”, असंही सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.