राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली.
ढाकणे गेली बारा वर्षे भाजपमध्ये होते. या काळात ते दोनदा पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाले. लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या कारणावरून अलीकडेच त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच त्यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ढाकणे यांनी या वेळी नगर लोकसभा मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला होता. त्यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केल्यानंतर ती मानली जात नाही हे पाहून त्यांनी गांधी यांना उमेदवारी दिल्यास पराभव करण्याचा जाहीर इशारा त्यांनी दिला होता. मात्र त्यानंतरही भाजपच्या उमेदवारीत बदल न झाल्याने अखेर ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडे त्यांनी केदारेश्वर सहकारी कारखान्याची पुनर्बाधणी, विधानपरिषदेवर संधी अशा काही मागण्या केल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पाथर्डी येथे झालेल्या सभेत ढाकणे यांनी पक्षप्रवेश केला. त्या वेळी योग्य वेळ येताच ढाकणे यांना योग्य संधी देऊ असे आश्वासन पवार यांनी दिले होते. तूर्त त्यांची पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार बबनराव पाचपुते, चंद्रशेखर घुले, अरुण जगताप, पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार आदींनी त्यांचे अभिनंदन केले.