मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिस वाहनचालकांना अन्यायकारक इ-चलान लावत आहेत. ई चलनाचा दंड भरून वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे.

अन्यायकारक लावलेले इ चलन रद्द करण्यात यावे यासाठी राज्यातील वाहतुकदारांनी ५ मार्च पासून आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अन्यायकारक इ चलन रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

वाहतूकदारांच्या अन्य समस्या सोडण्यासाठी येत्या ५ तारखेला परिवहन आयुक्तांच्या सोबत पोलीस प्रशासन व वाहतूकदारांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलवली असून या बैठकीत त्यांच्या मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यामुळे येत्या ५ तारखेपासून राज्यातील विविध वाहतूक संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे! असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे.

आंदोलनाच्या अनुषंगाने बोलावलेल्या राज्यातील विविध वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर संबंधित पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

इ- चलनाच्या संदर्भात वाहतूकदारांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. पार्किंग मध्ये असलेल्या वाहनांच्या वर आकस बुद्धीने इ-चलान काढले जातात. तसेच प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याच्या ऐवजी त्यांची अनुमती न घेता काही कर्मचारी इ- चलान काढतात. हे अन्यायकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणेला कडक सूचना दिल्या असून यापुढे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यानेच इ-चलानची कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत.

तसेच अन्यायकारकरीत्या यापूर्वी केलेल्या इ-चलान रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक असून येत्या ५ तारखेला परिवहन आयुक्तांच्या सोबत पोलीस प्रशासन व वाहतूक दार संघटनेचे प्रतिनिधी बसून आपल्या समस्या सोडवाव्यात तोपर्यंत आपले आंदोलन स्थगित करावे असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.