Pratap Sarnaik on Marathi language compulsion: रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीच्या सक्तीवरुन राज्यात वातावरण काहीसे तापले आहे. मराठी अनिवार्य करण्याबाबत महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाम भूमिका घेतली आहे. भाषा सक्तीला विरोध केल्यास सरनाईक यांनी कादेशीर आयुधं वापरण्याची देखील तयारी दर्शवली आहे. भाषा सक्तीच्या विषयासह मंत्री सरनाईक यांनी त्यांचा राजकीय प्रवास आणि प्रेम विवाह यावर भाष्य केले आहे.
भाषा सक्तीबाबत सरकारची भूमिका केली स्पष्ट
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी न्यूज-१८ दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले. सरनाईक यांनी यावेळी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेच्या अनिवार्यतेबाबत शासनाची भूमिका स्पष्ट केली. प्रवाशांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. १०-१५ वर्षे महाराष्ट्रात राहूनही रिक्षा किंवा टॅक्सी चालक मराठीत बोलत नाहीत, त्यामुळे वाद निर्माण होतात, अशी तक्रार अनेक प्रवासी करतात. आणि राज्य शासनाचा १९८९ चा अधिनियम आणि २०१९ चे परिपत्रक यानुसार मराठी भाषेबद्दल आधीच तरतूद आहे. परिवहन मंत्री म्हणून ते फक्त या नियमांची अंमलबजावणी करत आहेत, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
इतर राज्यांचे उदाहरण
मंत्री सरनाईक यांनी यावेळी इतर राज्यांचे उदाहरण देखील दिले. “कर्नाटक, तेलंगणा किंवा केरळ या राज्यांमध्ये तेथील स्थानिक भाषेतच संवाद साधला जातो, मग महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरण्यात चुकीचे काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ”प्रवाशांना त्यांच्या भाषेत सेवा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. चालकांनी प्रगल्भ मराठी बोलावी अशी अपेक्षा नाही, पण किमान संवाद साधण्याइतपत मराठी येणे आवश्यक आहे,” असे मंत्री सरनाईक म्हणाले. ”ज्या चालकांना मराठी येत नाही, त्यांच्यासाठी मुंबई साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांनी पुढाकार घेऊन शिकवण्यासाठी तयार आहे”, असे सरनाईक पुढे म्हणाले.
ज्या मुलीला मदत तीच प्रेमात पडली
प्रताप सरनाईक राजकारणात अचानक आलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वयाच्या १८ व्या वर्षापासून ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या प्रेमविवाहाचा रंजक किस्सा सांगितला. “घराच्या शेजारीच राहणाऱ्या एका मुलीला दहावीचा निकाल एक दिवस आधी मिळवून दिला होता. यामुळे ती मुलगी खूप खूश झाली. यानंतर या मुलीला डोंबिवलीच्या शाळेत प्रवेश देखील मिळवून देण्यातही मदत केली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्या मुलीचे १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्ही लग्न केले”, असा किस्सा सरनाईक यांनी सांगितला.
पत्नी गुजराती
माझी पत्नी गुजराती आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी या मुलाखतीत सांगितले. पत्नी फक्त मराठी भाषेत संवाद साधते असेही त्यांनी पुढे सांगितले. पण, भांडण मात्र गुजराती भाषेत करते असेही ते गंमतीत म्हणाले, सरनाईक यांना देखील गुजराती भाषा येते असे त्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी रिक्षा चालवली आणि भुर्जी-पावची गाडीही चालवली. या कठीण काळात त्यांच्या पत्नीने त्यांना खंबीर साथ दिल्याचे मंत्री सरनाईक यांनी या मुलाखतीत सांगितले.
