मुंबई : राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. या अवैध वाहतूकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या बेकायदेशीर वाहतूकीचा आर्थिक फटका अधिकृत वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

अशा अवैध प्रवासी वाहतूकीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. त्यासाठी १ मार्चपासून राज्यभर वाहन तपासणीची प्रभावी मोहीम राबवण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाला दिले.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, वाहनांची नियमित तपासणी न करणे आणि सुरक्षाविषयक नियमांकडे दुर्लक्ष करणे या प्रकारांमुळे अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता अधिक असते. अशा वाहनांना वैध विमा नसल्यास अपघातानंतर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळवणे कठीण होते. अनेक वेळा वाहनमालक किंवा चालक जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे पीडितांना न्याय मिळण्यात विलंब होतो.

अवैध वाहतुकीमुळे शासनाच्या महसुलालाही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सर्व नियम पाळणाऱ्या एसटी महामंडळासारख्या कायदेशीर वाहतूकदारांवर अन्यायकारक स्पर्धेचे ओझे येते आहे. दरकपात आणि अनियमित बाजारपेठेमुळे अधिकृत सेवा आर्थिक अडचणीत सापडतात. एसटी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवासीसंख्या घटल्याने नियोजित मार्ग व वेळापत्रकावरही त्याचा परिणाम झाला आहे.

वाहतूक तज्ञांच्या मते, अवैध प्रवासी वाहतूक ही केवळ आर्थिक प्रश्न नसून सामाजिक सुरक्षेचाही मुद्दा आहे. अशा वाहनांमुळे मानवी तस्करी, लुटमार किंवा इतर गुन्ह्यांना खतपाणी मिळत आहे. प्रवाशांची नोंद किंवा तपशील उपलब्ध नसल्याने तपास यंत्रणांना अडचणींचा सामना करावा लागतो.रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनेही हा प्रकार धोकादायक आहे. वेगमर्यादा भंग, बेदरकार वाहनचालकता आणि नियमांचे उल्लंघन यामुळे अपघात, वाहतूक कोंडी व प्रदूषणात वाढ होत असते.

या पार्श्वभूमीवर मोटार परिवहन विभागाने कडक अंमलबजावणी, नियमित तपासणी मोहीम आणि व्यापक जनजागृती यावर भर देणे आवश्यक असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले.

ऑनलाइन आणि पारदर्शक परवाना प्रक्रियेच्या माध्यमातून कायदेशीर वाहतूक सुलभ करणे. प्रवाशांनीही परवानाधारक सेवांचा वापर करण्यास प्राधान्य देणे. हे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई आणि जनसहभाग या दोनच मार्गांनी सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था निर्माण होऊ शकते, असे सरनाईक यांनी सांगितले. तोटयात चालणाऱ्या एसटी महामंडळाला आर्थिक दृष्टया सक्षम करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी कंबर कसली आहे.