“आम्ही गद्दार नसून…”; प्रताप सरनाईकांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर; विरोधकांनाही लगावला टोला

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले.

“आम्ही गद्दार नसून…”; प्रताप सरनाईकांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर; विरोधकांनाही लगावला टोला
संग्रहित

राज्याच्या पावसाळी अधिवेशनला कालपासून ( बुधवार १७ ऑगस्ट ) सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही विरोधकांकडून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन करण्यात आले. यावेळी पुन्हा शिंदे गटाविरोधात ‘५० खोके एकदम ओक्के, गद्दार’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. यासंदर्भात शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गद्दार म्हणण्यावरूनही प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले प्रताप सरनाईक?

राज्यात आज शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यावरील खड्डे, पूरस्थिती यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या घोषणाबाजीकडे लक्ष न देता, जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचं लक्ष आहे. ते विरोधक असल्याने त्यांना प्रसिद्धीसाठी काहीतरी करावं लागतं. मात्र, त्यांच्या टीकेकडे लक्ष न देता, चांगल्या सुविधा जनतेपर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या गद्दार म्हणण्यावरूनही प्रत्युत्तर दिले आहे. ”आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत”, असे ते म्हणाले.

विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणबाजी

‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओक्के’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केल्यानंतर आजही असाच प्रकार विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पहायला मिळाला. आज थेट शिवसेनेचे फुटीरतावादी नेते एकनाथ शिंदे जून महिन्यात बंडखोर आमदारांसोबत गुवाहाटीला वास्तव्यास होतो याच मुद्द्यावरुन विरोधकांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

‘ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा…’, ‘ईडी सरकार हाय हाय..’, ‘फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…’, ‘नही चलेगी… नही चलेगी दादागिरी नही चलेगी…’, ‘सरकार हमसे डरती है ईडी को आगे करती है…’, ‘फिफ्टी- फिफ्टी… चलो गुवाहटी…’, ‘गद्दारांना भाजपाची ताट – वाटी… चलो गुवाहाटी… चलो गुवाहाटी…’ अशा घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर आजही दणाणून सोडला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी Good News; शिवसेनेच्या प्रश्नानंतर शिंदे सरकारची मुंबई-गोवा हायवेसंदर्भात महत्त्वाची घोषणा
फोटो गॅलरी