Pratap Sarnaik RTO Marathi campaign : राज्यातील सर्व अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना एक मे पासून मराठी भाषा सक्ती करण्यात येणार असल्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी केली होती. त्याबाबत आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज आरटीओच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली. या चर्चेतून त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केवळ मराठी भाषेच्या सक्तीवरून कारवाई होणार नसून परिवहन विभागाने नेमून दिलेल्या २० कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर चालकांवरही कारवाई होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परिवहन विभागाचे २० कलमी नियम आहेत, या नियमांचं उल्लंघन केले तर परिवहन विभागाला चालकांवर कारवाई करण्याचा अधिकार असेल. त्यांचा परवाना परिवहन विभाग रद्द करेल. मराठी भाषेचा आदर आहे, आम्ही भाषा शिकायला तयार आहोत, असं संघटनांनी कळवलं आहे. त्यामुळे चालकांना मराठी शिकण्याकरता आरटीओ कार्यालयात जागा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण १ तारखेपासून मोहिम चालू राहणार. मराठीच्या मुद्द्यासाठी आरटीओचे अधिकारी त्यांना शिकवणार आहोत”, असं प्रताप सरनाईक म्हणाले. दरम्यान, चालकांना मराठी शिकता यावं याकरता पुस्तिका देण्यात येणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

प्रताप सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्र रोजगारनिर्मिती करणारं राज्य आहे. पण मराठीचं काय? मराठी आली पाहिजे, मराठी बोलली गेली पाहिजे. २०१९ ला एक परिपत्रक काढलं होतं, त्यानुसार २०२० साली राज्य शासनाच्या माध्यमातून ‘ऑटोरिक्षा चालकांसाठी मराठी’ ही पुस्तिका काढली होती. “

“टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी बोलण्याचं बंधन आहे. कारण ती आपली राजभाषा आहे. राज्यातील ५९ आरटीओंना निर्देश दिले आहेत, की आपली मोहिम चालू ठेवणार आहोत. राज्यात चुकीच्या पद्धतीने रिक्षा-टॅक्सी चालत असतील किंवा बेकायदेशीरित्या नियमभंग करत असतील, २० कायद्यांचं उल्लंघन केलं तर परमिट रद्द करू शकतो, या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असताना मराठी भाषेसाठी कारवाई करणार नाही, पण मोहीम चालू ठेवणार. १ ते १५ ऑगस्टच्या काळात सर्व आरीटओने समिती गठीत करून त्याद्वारे कोण कोण मराठी भाषा बोलत नाही याची माहिती घेतील”, असंही ते पुढे म्हणाले.

मराठी भाषेवरून परवाना रद्द होणार का?

मराठी भाषेवरून परवाना रद्द होणार नाही, पण परिवहन विभागाच्या २० कलमांचं उल्लंघन केलं तर परवाना रद्द केला जाईल. ५६५ अमराठी रिक्षाचालकांचा जबाब घेतला असून त्यापैकी अनेक चालकांनी मराठी शिकण्यास सहमती दर्शवली आहे. मराठी भाषा शिकायला तयार असाल तर वेळ द्यायला तयार आहोत, त्याकरता आरटीओ तुम्हाला मदत करेल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

हिंदी भाषिकांनी मराठी भाषेचं स्वागत केलं असून त्यांना संधी देणं गरजेचं आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की कोणी कितीही दबाव टाकला, बंदची हत्यारे उगारली तरीही महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोलायलाच लागेल, त्याकरता आम्ही मराठीही शिकवू. ‘जुजबी मराठी पुस्तिके’चे उद्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रकाशन करणार आहोत, असंही सरनाई म्हणाले.