मुंबईसह महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदत दिली आहे. ही मुदत आधी १०५ दिवसांची होती. मात्र इतक्या कमी कालावधीत मराठी शिकणं शक्य नाही असं अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं म्हणणं होतं. त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी हे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांना या प्रतिनिधींनी सगळ्या अडचणी आणि समस्या समजावून सांगितल्या आणि मराठी शिकण्यासाठी मुदत आणखी वाढवून द्या अशी विनंती केली. ही विनंती मान्य करत देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभराची मुदत या रिक्षा टॅक्सी चालकांना दिली आहे. यानंतर या सगळ्याविषयी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलं आहे?

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी बोलता आलं पाहिजे यासाठी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मराठी भाषा शिकण्यासाठीचं अभियान सुरु केलं आहे. जे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक मुंबईत येतात त्यांना जुजबी मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे म्हणून आम्ही हे अभियान सुरु ठेवलं आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यानंतर जर तुम्ही परत निर्णय मागाल तर ते योग्य होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला बंधनकारक असतो. पण आमच्या अभिनयातून त्यांना मराठी शिकावं लागेल. मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय दिला आहे तर तो आम्हाला बंधनकारक आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

कुणाचा रोजगार हिरावून घ्यायचा ही आमची भूमिका नाही-सरनाईक

प्रताप सरनाईक म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची मुदत दिली आहे तर त्या वर्षभरात त्यांनी मराठी शिकावं, मराठी बोलावं. मला तर असं वाटतं की वर्षभराने आमचे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक फाडफाड मराठी बोलू शकतील. आम्हाला त्याचा आनंद आहे. आमचं महायुतीचं सरकार आहे, ते रोजगार निर्माण करणारं आहे रोजगार हिरावून घेणारं सरकार नाही. कुणाचा बॅज निलंबित करायचा, त्यांचा रोजगार हिरावून घ्यायचा ही आमची भूमिका नाही. महाराष्ट्रात आला आहात रोजगार करायचा असेल तर मराठी बोलावं लागेल. वर्षभराची मुदत दिली आहे त्यामुळे वर्षभराने का होईना पण मराठी बोलावंच लागेल ही आमची भूमिका आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

वेळ दिला गेला आहे ही चांगलीच गोष्ट-सरनाईक

रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला त्याआधी तुम्हाला विश्वासात घेतलं होतं का? असं विचारलं असता प्रताप सरनाईक म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत,त्यांच्याकडे सर्वाधिकार आहेत. आम्ही ज्या अभिनयानामार्फत आम्ही १ लाख ६५ हजार अमराठी रिक्षा चालकांना मराठी शिकवलं. त्याची पुस्तिका जी आहे त्याविषयीच्या कार्यक्रमालाही देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी मला तेव्हाही म्हटलं होतं की या सगळ्यांना आपण वेळ द्यायला हवा. वेळ दिला की शिकता येईल. त्यामुळे १०५ दिवसांची मुदत दिली होती. पण काही लोक वर्ग कमी पडल्यामुळे किंवा शिक्षक कमी पडले असतील त्यामुळे मुदत दिली गेली आहे. एक वर्षानंतर का होईना मराठी आलंच पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले.