वाई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड ३६२ मशालींमुळे उजळून निघाला. प्रतापगडा वरील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ ,सातारा महाबळेश्वर,पुण्यातील व महाड रायगड येथील शिवभक्तांच्या वतीने भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता. नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत असतात. हा मशाल महोत्सव धुक्याच्या काळोखात  संपन्न झाला.३६२ मशाली धुक्यात ह्ररवल्याचेही दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रतापगडा वरील भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रतापगड,महाबळेश्वर,सातारा,पुणे,कोल्हापूर,सांगली आदी विविध भागांमधून हजारो भाविकांनी तरुणांनी प्रतापगडावर हजेरी लावली.

नवरात्री पूर्वी पंधरा दिवस आधीपासून या महोत्सवाच्या तयारीचे काम सुरु होते. असंख्य लोक या कामात आपला खारीचा वाटा उचलतात. प्रतापगडावर प्रेम करणारे अनेक शिवभक्त या कार्यक्रमात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करतात. मशाल महोत्सवासाठी लागणाऱ्या मशाली तसेच इतर साहित्याची तयारी गडावर जोरात सुरु होती.यासाठी प्रतापगड परिसरासह सातारा,पुणे,कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते गडावर पोहोचतात.गुरुवारी दिवसभर या कार्यक्रमाची तयारी सुरु होती. भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोष करून मशाली प्रज्वलित करत तुतारीचा नाद करत गड दणाणून निघाला.गडावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये बोचऱ्या थंडीतही मोठा उत्साह होता.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजाऱ्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात व भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratapgad fort resplendent feat chhatrapati shivaji maharaj illuminated ysh
First published on: 30-09-2022 at 01:09 IST