“राज्यात कुठलीही घटना घडली तर दरेकर आधी पीडितांना धीर देण्यासाठी दुर्घटना स्थळी जातात की स्टूडिओत जातात हे महाराष्ट्रातील जनता जाणते. भास्कर जाधव हे डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारख वागत आहेत. त्यांना पाहिल्यावर शेतातील एखादं बुजगावणं असावं असा त्यांचा अविर्भाव व चित्र दिसून येते.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेना आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, “मला वाटतं भास्कर जाधव सध्या अडगळीत पडलेले आहेत. खंर म्हणजे संजय राऊत म्हणाले आहेत की मंत्र्यांनी आता प्रतिहल्ला केला पाहिजे. ते अजुन काही मंत्री झालेले नाहीत, व्हायच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवीण दरेकर स्टुडिओत जातात की चॅनल्स येतात हे महाराष्ट्राती जनता पाहते. अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या बांधावर प्रवीण दरेकर असतात, महिलांवर अन्याय, अत्याचार झाला त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबास धीर देण्यासाठी प्रवीण दरेकर पोहचतात. निसर्ग वादळ असेल, तौक्ते वादळ असेल, प्रवीण दरेकर पोहचातात. महाडला दरड कोसळी, तळीयेला गाव उध्वस्त झाला, प्रवीण दरेकर पोहचतात. अगदी चिपळूणला भास्कर जाधव कुठे गायब असताना प्रवीण दरेकर पोहचतात. त्यामुळे मला वाटतं त्यांना डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं वाटतय आणि मी तर स्टुडिओत वाटत असेल, हल्ली ते माध्यमांसमोर येतात तेव्हा त्यांना पाहिल्यावर शेतामध्ये एखादं बुजगावण असतं तशाप्रकारचा त्यांचा अविर्भाव आणि चित्र दिसतं.”

तर, भास्कर जाधव यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना, “राज्यात कुठलीही घटना घडली तरी दरेकर स्टुडिओमध्ये दिसतात. याचा अर्थ असा होतो की एक तर ते स्टुडिओमध्ये जाऊन बसलेले असतात किंवा मीडियाचे लोक त्यांच्या घरी जाऊन बसलेले असतात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी प्रतिक्रिया देण्यासाठी प्रवीण दरेकर उपलब्ध असतात.”, असं म्हटलं होते.