मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींची कुणबी प्रमाणपत्रे रद्द झाल्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यावरून सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला होता. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट टीका केली होती. तर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत थेट त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमके काय म्हणाले प्रवीण दरेकर?
मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला उत्तर देताना प्रवीण दरेकर म्हणाले, “रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणे आणि सिस्टीममध्ये राहून काम करणे, यात खूप मोठा फरक असतो.”
तसेच जरांगे यांच्या अभ्यासावर आणि कारभाराच्या समजावर प्रश्न उपस्थित करत दरेकर पुढे म्हणाले, “एखाद्यावर थेट आरोप करायला फार अक्कल लागत नाही. ज्यांना प्रशासकीय सिस्टीम समजूनच घ्यायची नाही, त्यांच्याबद्दल काय बोलणार? जात पडताळणी समितीला स्वतंत्र न्यायालयीन अधिकार असतात. त्यात कोणताही मंत्री थेट हस्तक्षेप करू शकत नाही. प्रमाणपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील, म्हणूनच ती रद्द झाली असतील.”
“झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण जे झोपेचं सोंग घेतात, त्यांना कधीच जागं करता येत नाही,” अशी घणाघाती टीकाही दरेकर यांनी जरांगे यांच्यावर केली.
‘५० आमदार पाडून दाखवावेच’; दरेकरांचे जरांगेंना थेट आव्हान
अंतरवाली सराटी येथील पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे यांनी आगामी निवडणुकीत सरकारचे ५० आमदार पाडण्याचा इशारा दिला होता. यावर भाष्य करताना प्रवीण दरेकर यांनी जरांगेंना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे आव्हान दिले.
“मनोज जरांगे यांनी स्वतः एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवून विधानसभेत यावे, म्हणजे त्यांना सिस्टीम कशी चालते हे समजेल. जर ते ५० आमदार पाडू शकत असतील, तर माझ्या त्यांना शुभेच्छाच आहेत,” असा टोला दरेकरांनी लगावला.
‘मराठा-ओबीसी वाद महाराष्ट्राच्या हिताचा नाही’
महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याचा उल्लेख करत प्रवीण दरेकर यांनी समाजाला जोडण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “महाराष्ट्र हे सर्व जाती-धर्मांना एकत्र घेऊन चालणारे राज्य आहे. त्यामुळे माणसं तोडण्यापेक्षा जोडण्याचं काम सर्वांनी करायला हवे. मराठा आणि ओबीसी यांच्यात असा वाद निर्माण करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही.”
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बचाव करताना दरेकर म्हणाले की, बावनकुळे हे सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत, त्यांची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे एका व्यक्तीमुळे नव्हे, तर अठरापगड जातींच्या ताकदीवर आणि विश्वासावर महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
