Nivedita Ekbote on Prem Birhade Letter of Recommendation : यूकेमध्ये नोकरी लागलेल्या प्रेम बिऱ्हाडे या तरुणाने पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयावर (जिथून त्याने पदवीचं शिक्षण घेतलं आहे) जातीयवादाचे गंभीर आरोप केले आहेत. त्याने समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की “महाविद्यालयाने मला संदर्भपत्र व कंपनीने मागितलेले कागदपत्र दिले नाहीत त्यामुळे मी लंडनमधील नोकरी गमावली आहे. काही लोकांना आम्ही दलितांनी पुढे गेलेलं बघवत नसल्यामुळेच त्यांनी माझे दस्तावेज पुरवले नाहीत.”

दरम्यान, प्रेम बिऱ्हाडेने महाविद्यालयावर केलेल्या आरोपांवर महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी उत्तर दिलं आहे. तसेच त्याच्याविरोधात कारवाई करावी अशी पोलिसांना विनंती केली आहे. निवेदिता एकबोटे यांनी यासंदर्भात पोलिसांना लिहिलेलं पत्र फेसबूकवर शेअर केलं आहे.

निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “माजी विद्यार्थी प्रेमवर्धन नरोत्तम बिरहाडे याच्याकडून होणाऱ्या छळ, बदनामी आणि सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत तक्रार. मी निवेदिता एकबोटे, प्राचार्या, मॉडर्न आर्ट्स, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स कॉलेज (स्वायत्त), शिवाजीनगर, पुणे, आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छिते की आमच्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रेमवर्धन नरोत्तम बिरहाडे (BBA अभ्यासक्रम – प्रवेश: जून २०२०, उत्तीर्ण: जानेवारी २०२४) याच्याकडून सातत्याने छळ, बदनामी आणि सोशल मीडियाचा जाणूनबुजून गैरवापर करून महाविद्यालय, अध्यापकवर्ग आणि प्राचार्या यांची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न चालू आहे.”

“शिफारस पत्र, बोनाफाइड प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही महाविद्यालयाची बदनामी”

“सदर विद्यार्थी माझ्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळापूर्वीच आपले शिक्षण पूर्ण करून गेला असून, मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखत नाही तसेच त्याला शिकवलेलं नाही. हे विशेष नमूद करावेसे वाटते की, सदर विद्यार्थ्यास महाविद्यालयाकडून यापूर्वी तीन वेळा Letter of Recommendation (LOR) तसेच एक बोनाफाईड प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे त्याच्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांशी संबंधित मागण्या महाविद्यालयाने पूर्वीच पूर्ण केल्या आहेत.”

जातीभेदाचे खोटे आरोप?

निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “अलीकडेच प्रेम बिऱ्हाडे याने पुन्हा एकदा महाविद्यालयात येऊन Education Reference माझ्या स्वाक्षरीने देण्याची मागणी केली. त्याच्या महाविद्यालयीन काळातील शिस्त व वर्तन समाधानकारक नसल्याने आणि संस्थेच्या धोरणानुसार, त्याला आणखी कोणतेही संदर्भपत्र देण्यास नकार देण्यात आला. यानंतर सदर व्यक्तीने सोशल मीडियावर खोटे, दिशाभूल करणारे व उत्तेजक व्हिडिओ प्रकाशित करून महाविद्यालय, डॉ. अंजली सरदेसाई (उपप्राचार्या – शैक्षणिक), प्रा. लॉली दास (प्रमुख – बीबीए विभाग) तसेच प्राचार्यांविरोधात जातीभेदाचे खोटे आरोप प्रसारित करण्यास सुरुवात केली.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राचार्य झाले : निवेदिता एकबोटे

“मी स्पष्टपणे नमूद करू इच्छिते की महाविद्यालयात कधीही जातीवर आधारित भेदभाव झालेला नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याने अथवा अधिकाऱ्याने त्याच्या जातिविषयी कधीही चर्चा केलेली नाही. आमची संस्था समानता, सर्वसमावेशकता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर कार्यरत असून अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसह सर्व विद्यार्थ्यांना समान संधी व सहाय्य उपलब्ध करून देते. तसेच, मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मनःपूर्वक वंदन करते. त्यांनी दिलेल्या शिक्षण, समानता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांनी माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर खोल प्रभाव टाकला आहे. डॉ. आंबेडकरांनी घडवलेल्या संविधानिक चौकटीमुळेच मी आज या प्रतिष्ठित संस्थेची प्राचार्या म्हणून अभिमानाने कार्यरत आहे.”

संदर्भपत्र का दिलं नही?

प्राचार्या निवेदिता एकबोटे म्हणाल्या, “सदर विद्यार्थ्यास संदर्भपत्र न देण्याचा निर्णय हा संस्थेच्या धोरण, शिस्त आणि व्यावसायिक प्रामाणिकतेच्या निकषांवर आधारित असून त्याचा त्याच्या सामाजिक किंवा जातीय पार्श्वभूमीशी कोणताही संबंध नाही. सदर विद्यार्थी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवून विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे, असंतोष पसरवत आहे आणि त्यामुळे महाविद्यालयाच्या व अधिकार्‍यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवत आहे. त्याचे हे कृत्य बदनामी, सायबर छळ आणि डिजिटल माध्यमांतून भडकावू प्रचार या स्वरूपाचे आहे. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की, या प्रकरणाची गंभीर नोंद घेऊन भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) यांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून पुढील त्रास, बदनामी आणि संस्थेच्या शांततेत व्यत्यय येणार नाही.”