scorecardresearch

उदगीर साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात; ३६ एकर परिसरात तयारी; ग्रंथदिडींचे नेतृत्व दुचाकीस्वार तसेच महिलांकडे

उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडाच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला असून साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

लातूर : उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मराठवाडाच नव्हे तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशचा सीमाप्रांतही सज्ज झाला असून साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  येत्या २२ ते २४ एप्रिल या कालावधीत महाविद्यालयाच्या सुमारे ३६ एकरच्या परिसरात संमेलन साजरे होणार आहे.

साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथिदडीने होणार असून यंदाच्या ग्रंथिदडीची तीन खास वैशिष्टय़े आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या सीमांना एकसंध करणाऱ्या एका ग्रंथिदडीचे नेतृत्व दुचाकीवर स्वार असणारे महिलांचे पथक करणार आहे. या पथकात घोडेस्वारी करणाऱ्या महिलाही असणार आहेत. ग्रंथिदडीचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे ‘गुगलविधी’ असून कर्नाटकातील ‘गुगल’ नृत्यप्रकारानुसार विवाहापूर्वी वाजत गाजत, नृत्य करत देवतेची पूजा करण्यात येते. हा विधी ग्रंथिदडीत अनुभवायला मिळणार आहे. मराठी भाषेच्या नवरसांची समृद्धी दर्शविणारी ‘नवरंग’ दिंडी हे तिसरे वैशिष्टय़ असणार आहे. पाचशे  शालेय विद्यार्थी नऊ रंगांच्या टोप्यांसह सहभागी होणार आहेत. यासह ढोल, लेझीम, वासुदेव, गोंधळी आणि अन्य लोककला सादर करणारे १५० कलावंत ग्रंथिदडीत सहभागी होणार आहेत.

साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी गेल्या तीन महिन्यांपासून अनेकजण अहोरात्र झटत आहेत. नियोजन आता अंतिम टप्प्यात आले असून साहित्यप्रेमी रसिकांनी संमेलनाला उपस्थित राहून संमेलनाचा आनंद घ्यावा असे आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, कार्याध्यक्ष बसवराज पाटील-नागराळकर, मुख्य कार्यवाह रामचंद्र तिरुके, कोषाध्यक्ष प्रा. मनोहर पटवारी, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर.तांबोळी यांनी केले आहे.

दरम्यान साहित्य संमेलनाच्या ग्रंथिदडीत म्हाइंभट लिखित ‘लीळाचरित्र’ ग्रंथ ठेवण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन महानुभव भक्त परिषदेचे संयोजक दत्तराज शास्त्रीबाबा राठोड, महंत गोपालमुनजी संन्याशी पेठ, महंत श्रीधरदादा लासूरकर पेठ यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष आणि महानुभव भक्त परिषदेचे युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांना देण्यात आले.

  • आजपर्यंत झालेल्या ९४ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या छायाचित्रांचे विशेष दालन
  • मुख्य मंडपाला छत्रपती शाहू महाराज सभागृह यांचे नाव
  • व्यासपीठाला उदयगिरी महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांचे तर परिसंवादांच्या दालनाचे विलासराव देशमुख सभागृह नामकरण
  • शांता शेळके कविकट्टा, सुरेश भट गझलकट्टा, ग्रंथ प्रकाशनाची तीन स्वतंत्र दालने
  • चित्र-शिल्प कलादालन, अभिजात मराठी दालन, बालमेळाव्याचे स्वतंत्र दालन 
  • साहित्यनगरीच्या प्रवेशद्वारावर उदगीर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Preparations udgir sahitya sammelan final stage preparation two wheelers women ysh