तळीये गावाच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार

घरांची बांधणी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून करण्यात येणार आहे.

Maharashtra Rains Landslide Taliye Mahad Raigad
(सर्व फोटो : दीपक जोशी, इंडियन एक्सप्रेस)

मुंबई : रायगडमधील दरडग्रस्त तळीये गावाचे पुनर्वसन आता लवकरच मार्गी लागणार असून पुनर्वसनाचा सविस्तर आराखडा नुकताच पूर्ण करण्यात आला. या आराखड्यास मंजुरी घेऊन निविदा प्रक्रि या पूर्ण करून डिसेंबरअखेरीस कामाला सुरुवात करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.

या आराखड्यानुसार १७ हेक्टर जागेवर पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येणार असून एका कुटुंबाचे ३००० चौ. फूट जागेवर पुनर्वसन केले जाणार असून यात ६०० चौ. फुटांच्या घराचा समावेश आहे.

जुलैमध्ये तळीये गावातील कोंढाळकरवाडी येथे दरड कोसळून त्यात ऐंशीहून अधिक गावकऱ्यांचा बळी गेला होता. कोंढाळकर वाडीसह दरड कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असलेल्या तळीयेतील अन्य वाड्यांचे (गावांचे) पुनर्वसन म्हाडा, रायगड जिल्हाधिकारी आणि मदत व पुनर्वसन विभागाकडून करण्यात येत आहे. त्यासाठीचा आराखडा अखेर पूर्ण करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. तळीयेतील १७ हेक्टर जमीन यासाठी संपादित करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला ३००० चौ. फूट जागा देण्यात येणार असून यात ६०० चौ. फुटांच्या ‘प्री फॅब’ पद्धतीच्या घराचा समावेश असेल. तसेच शाळा, अंगणवाडी, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि अन्य आवश्यक त्या सुविधांचाही आराखड्यात समावेश करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

घरांची बांधणी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून करण्यात येणार आहे. इतर आराखड्यातील सर्व सुविधांचे बांधकामही कोकण मंडळ करणार आहे. या सुविधांचा विकास करण्यासाठी मदत आणि पुनर्वसन विभागाकडून कोकण मंडळाला आर्थिक निधी दिला जाणार असल्याचेही कल्याणकर यांनी स्पष्ट केले. पुनर्वसन योजनेचा आराखडा तयार झाला असून आता तो लवकरच मंजुरीसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल. याला मंजुरी मिळाल्यास पुढील कार्यवाही करत निविदा काढण्यात येतील अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.

आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडाकडून निविदा काढण्यात येईल. डिसेंबरअखेरीस बांधकामास सुरुवात करत मे-जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. – डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prepare a plan for the rehabilitation of taliye village akp

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या