तरुणाईच्या श्रमशक्तीने पारंपरिक जलव्यवस्थापनाचे जतन; परभणी जिल्ह्यात बारवांच्या पुनरुज्जीवनाची मोहीम

बारव म्हणजे पायऱ्यांची दगडी विहीर. पण या पायऱ्या सुद्धा अनोख्या आणि वैशिष्टय़पूर्ण. काळय़ाकभिन्न दगडात अनेक ठिकाणी पारंपरिक जलव्यवस्थापनाचा नमुना म्हणून या बारव पाहायला मिळतात.

आसाराम लोमटे

परभणी : बारव म्हणजे पायऱ्यांची दगडी विहीर. पण या पायऱ्या सुद्धा अनोख्या आणि वैशिष्टय़पूर्ण. काळय़ाकभिन्न दगडात अनेक ठिकाणी पारंपरिक जलव्यवस्थापनाचा नमुना म्हणून या बारव पाहायला मिळतात. प्रत्येक बारवेची रचना वेगळी, पण काळाच्या ओघात हा वारसा नष्ट व्हायला लागला.  मात्र आता परभणी जिल्ह्यात बारवांच्या संवर्धनाच्या मोहिमेने वेग घेतला असून यात तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.

परभणी जिल्ह्यात अशा बारवांचे पुनरुज्जीवन करण्याचे अभियान लोकसहभागाच्या बळावर उत्स्फूर्तपणे सुरू आहे. सकाळी ६ वाजता गावातले तरुण एकत्र येतात. बारवेतील गाळ, काडी- कचरा काढण्याचे काम श्रमदानातून करतात. आज जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या अडगळीला गेलेल्या बारवा यानिमित्ताने लखलखीत झाल्या आहेत. त्याचबरोबर बारवांचे विलोभनीय स्थापत्यही डोळय़ाचे पारणे फेडत आहे.

विहीर, बारव हे आपल्याकडे पाण्याचे स्त्रोत. त्यात वैशिष्टय़पूर्ण दगडी बांधकामामुळे बारवा लक्ष वेधून घेतात. अनेक ठिकाणी अशा बारव आहेत, पण कालांतराने त्यात गाळ साचत गेला.. काडी कचरा साठत गेला. हळूहळू त्या पूर्णपणे बुजून गेल्या.  जलव्यवस्थापनाचा हा पारंपरिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे बारवांचे संवर्धन करण्याच्या मोहिमेने वेग घेतला आहे.

या कामी पुढाकार घेणारे मल्हारीकांत देशमुख म्हणाले, की राणी सावरगाव (तालुका गंगाखेड) या ठिकाणी असलेली समुद्र विहीर नावाची बारव स्वच्छ करण्याच्या मोहिमेतून या कामाचा प्रारंभ झाला.  आता गाळ उपसल्यामुळे तिच्यातले स्वच्छ पाणी दिसू लागले आहे. अलीकडेच पेडगाव येथील बारवेतला गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. तरुणांनी श्रमदानातून हे काम पूर्ण केले. मानवत येथील अमरेश्वर या प्राचीन शिवमंदिर परिसरात मोठी बाग होती, पण बारवेभोवती प्रचंड झाडे झुडपे होती. गाळ, मातीने भरलेल्या या बारवेच्या पुनरुज्जीवनासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. सोळा दिवस हे काम चालले. या ठिकाणच्या श्रमदानात आमदार मेघना बोर्डीकर याही सहभागी झाल्या. कासापुरी (तालुका पाथरी) येथील बारव याच पद्धतीने स्वच्छ करण्यात आली. सेलू तालुक्यातील वालूर या ठिकाणी असलेल्या बारवेतील गाळ आणि कचरा काढून टाकल्यानंतर त्याठिकाणी आता बारवेचे जे रूप दिसत आहे ते विलोभनीय आहे. स्थापत्याचा तो एक अद्वितीय नमुना ठरावा. पायऱ्यांची अनोखी घडण अप्रतिम आहे. या ठिकाणचे श्रमदान रात्री दिवे लावून करण्यात आले. 

सध्या या सर्व बारवांच्या पुनरुज्जीवनात तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. दररोज सकाळी दोन तास श्रमदान केले जाते. गावकरी, स्थानिक कार्यकर्ते यात हिरिरीने सहभाग घेतात. सध्या या कामी जिल्ह्यात किमान दीडशे तरुण सहभागी असल्याची माहिती मल्हारीकांत देशमुख यांनी दिली. वालूरनंतर जिंतूर, भोगाव, बोरकिनी या ठिकाणी बारवांना स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे ते म्हणाले.

बारव बचाव मोहीम या नावाने सध्या सुरू असलेले हे अभियान पुढे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी राबवले जाईल. जिल्ह्यातील चारठाणा हे गाव अशा अनेक स्थापत्त्यांचा समृद्ध वारसा असणारे आहे. वेरूळ, होट्टल या ठिकाणच्या महोत्सवाच्या धर्तीवर चारठाणा फेस्टिवल घेण्यात येईल असेही देशमुख यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Preservation traditional water management youth labor force revival campaign ysh

Next Story
राज्यातील प्रथम क्रमांकाच्या मतदाराचा संसार शासकीय अनास्थेमुळे रस्त्यावर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी