लातूर : उदगीर येथे होत असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर समारोपाच्या दिवशी दुपारच्या सत्रात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. समारोपाचा मुख्य समारंभ केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष संजय बनसोडे यांनी रविवारी येथे दिली.

उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी लेखक दामोदर मावजों, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, मावळते अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह शिवराज पाटील चाकूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, भाषामंत्री सुभाष देसाई, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांची उपस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरीत २२ ते २४ एप्रिलदरम्यान संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी २० एप्रिल रोजी अजय-अतुल संगीत रजनी, २१ एप्रिल रोजी ‘चला हवा येऊ द्या’ हे कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज मुख्य सभामंडपात होणार आहे. २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संमेलनस्थळापर्यंत ग्रंथिदडी निघणार आहे. संमेलनाध्यक्षांच्या हस्ते व गो. बं. देगलूकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथपूजन होणार आहे. १० वाजता अ. भा. मराठी साहित्य महामंडळ अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. संमेलनात ना. य. डोळे, हुतात्मा भाई श्यामलालजी, धर्मवीर अ‍ॅड. संग्रामअप्पा शेटकार यांच्या नावे व्यासपीठ, तर अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर ग्रंथदालन, कलामहर्षी बाबूराव पेंटर कला मेळा, लोकनेते विलासराव देशमुख परिसंवाद सभामंडप, अभिजात मराठी दालन, शांता शेळके कविकट्टा-देवीसिंह चौहान सभागृह, सुरेश भट गझलमंच-सिकंदर अली वज्द सभागृह, पुस्तक प्रकाशन दालन असणार आहे. या मंचाचे डॉ. जयंत नारळीकर, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, लक्ष्मीकांत देशमुख, मंत्री सुभाष देसाई, फ. मुं. शिंदे, श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पहिल्या दिवशी पाच परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन, लोककलेतील लोकनृत्य. दुसऱ्या दिवशी राजन गवस यांची प्रकट मुलाखत विनोद शिरसाठ, प्रमोद मुनघाटे घेतील. तसेच प्रकाशकांचा सत्कार, ‘मी मराठी बोलतोय’चे सादरीकरण, कादंबरीकारांशी संवाद, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम तर दोन परिसंवादांसह सीमावर्ती निमंत्रितांचे कविसंमेलन, बालमेळावा, बालकांचे काव्यवाचन, प्रा. दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे बाल कविसंमेलन, आबा महाजन यांची मुलाखत, निमंत्रितांचे बाल कथाकथन होणार आहे. समारोपादिवशी अवधूत गुप्ते संगीत रजनी, तीन परिसंवाद, बाल कादंबरी वाचन, बाल साहित्यिकांशी संवाद-गप्पा, सुंदर माझी शाळा, कविकट्टा असे कार्यक्रम होणार आहेत.