नारायणगाव : काही दिवसांपूर्वी कवडीमोल ठरलेला टोमॅटो आता चांगलाच भाव खात असून, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात टोमॅटोला प्रतिकिलो ५० रुपये दर मिळाला आहे. कोथिंबिरीच्या जुडीलाही उच्चांकी भाव मिळाला आहे. एक जुडीसाठी तब्बल ८० रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

बाजार समितीचे सभापती डॉ. संजय काळे आणि सचिव रुपेश कवडे यांनी याबाबतची माहिती दिली. नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात कोथिंबीरसह मेथी , शेपूचेही बाजारभाव वधारल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. अ‍ॅड. काळे म्हणाले, की नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात कोथिंबीर, मेथी, शेपूची आवक चांगली होऊन या वर्षांतील हंगामातील सर्वाधिक दर शेतकऱ्यांना मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रात कोथिंबीरच्या ३६ हजार ६०० जुडय़ांची आवक होऊन शेकडा जुडीला ७००१ रुपये पासून ८००० रुपये दर मिळाला आहे. मेथीची ५१ हजार २०० जुडय़ांची आवक होऊन शेकडा जुडीला ५०१ रुपये पासून ३१०० रुपये दर, तर शेपूची २३ हजार १०० जुडय़ांची आवक होऊन शेकडा जुडीला १००१ रुपये पासून १८५१ रुपये दर मिळाला आहे. टोमॅटोच्या २० किलोच्या १ लाख १० हजार ९०० क्रेटची आवक होऊन एका क्रेटला ५०० ते १००० रुपये दर मिळाला असून या वर्षांतील हंगामातील हे सर्वाधिक दर आहेत. नारायणगाव उपबाजार केंद्रात कोथिंबीर, मेथी, शेपू विक्रीसाठी पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि नगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर येथील शेतकरी येतात.