सांगली : या हंगामातील हळदीच्या सौद्यास सांगली बाजार समितीत सुरूवात झाली असून पहिल्याच सौद्यात राजापुरी हळदीला प्रतिर्क्विटल २८ हजाराचा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती, वसंतदादा मार्केट यार्ड, सांगली येथे नवीन राजापुरी हळद सौद्याचा शुभारंभ संचालक आनंदराव नलवडे यांचे हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुपार्श्व ट्रेडिंग कंपनी,राजेंद्र बाळगोंडा पाटील या दुकानात कृष्णमूर्ती मारुती हनमनावर (रा. जागणुर ता. गोकाक जि बेळगाव) या शेतकर्याची हळद रुपये २८ हजार १ रूपये प्रति क्विंटल या उच्चांकी दरात मनाली ट्रेडिंग कंपनी यांनी खरेदी केली.
हळदीची काढणी सुरू झाली असून हंगामात निघालेल्या हळदीची आवक बाजारात सुरू झाली आहे. सौद्याच्या शुभारंभास ६०२५ पोत्याची आवक झाली. नवीन हंगामातील हळदीला प्रतवारीनुसार किमान १३ हजार ते कमाल २८ हजार रूपये प्रति क्विंटल दर मिळाला. हळद सौदे शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे संचालक, शशिकांत नागे, प्रशांत पाटील मजलेकर, काडापा वारद ,सचिव महेश चव्हाण, उपसचिव सुनील केळुसकर , चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, मनोहर सारडा, दीपक चौगुले, श्रीकांत मर्दा, दिलीप आरवाडे, सतीश पटेल, नितीन पाटील व इतर असोसिएशनचे चे पदाधिकारी, व हळद खरेदीदार, अडते, शेतकरी, हमाल, तोलाईदार आदी उपस्थित होते.
सांगली बाजारात नवीन हळदीचे सौदे सुरू झाले असून शेतकर्यांनी आपली हळद विक्रीसाठी सांगली बाजारात आणावी असे आवाहन बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी केले आहे.

