महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकरी अन् ५० लाखांवर शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना आघाडी शासन वा-यावर सोडून देणार असेल तसेच ऊसदरप्रश्नी मुख्यमंत्री मध्यस्थी करणार नसल्याचे म्हणत असतील तर, हे सरकार उद्योगपती, वाळूमाफिया व बिल्डरांचे म्हणायचे का, असा सवाल करीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली. उद्या कराड येथे १ लाख ऊस उत्पादक न्याय मागण्यासाठी येणार असून, आर. आर. पाटील पोलिसांना शेतक-यांच्या अंगावर घालणार असतील तर, त्याची किंमत येत्या निवडणुकीत चुकती होईल असा इशारा खोत यांनी दिला.
ऊस दरवाढप्रश्नी शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आम्ही कराडात तपश्चर्येला अथवा प्रायचित्त घ्यायला येणार नसून, यशवंतराव चव्हाणांचे चेले शेतक-यांवर अन्याय करत असल्याने चव्हाण साहेबांच्या समाधीला अभिवादन करून ऊसदराचा न्याय मागणार आहे. आमचे कराडमधील येण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांच्या बंदुकीत ठासून गोळय़ा भरल्या आहेत. या गोळय़ा संपतील पण गोळय़ा झेलणा-या छाती कमी पडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. कराड बाजार समिती, कराडमधील व्यापारी तसेच कराड व मलाकपुरातील नगरसेवकांनी आमच्या उद्याच्या आंदोलनाला विरोध दर्शवला असल्याचे भासवले जात आहे. प्रत्यक्षात मात्र, व्यापा-यांना पुढे करून तीर मारला जात आहे. मार्केट कमिटीच्या जागेला ५० हजार रुपये भाडे कशासाठी असा प्रश्न उपस्थित करून आमच्या आंदोलनाला ऐनकेन कारणाने अडचणी निर्माण करण्याचा उद्योग जोरात सुरू असल्याचे ते म्हणाले. आमच्याकडून या आंदोलनाला हिंसक वळण अथवा गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल. परंतु, हे आंदोलन चिरडण्याचाच घाट शासनाने घातल्याने उद्या तेच हिंसक वळण लावतील असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. राज्यातील आघाडी सरकार भ्रष्टाचारी आणि दरोडेखोर असल्याचीही टीका करताना, अशा सैतानांना सॅल्युट करण्याची वेळ पोलिसांवर येत असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. पोलिसांशी आमचे भांडण नाही. ही मंडळीही शेतक-यांचीच मुले आहेत. याची आम्हाला जाणीव आहे. त्याप्रमाणे त्यांनीही आपल्या कर्तव्यानुसार चालावे. परंतु, उद्या येणा-या शेतक-यावर अन्याय करू नये, असे आवाहन त्यांनी केले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे दरोडेखोर शंभर साखर सम्राटांचे अलिबाबा असल्याचीही टीका त्यांनी केली. आज कराडात बघेल तिकडे पोलीस दिसतात. जमावबंदीचा आदेश लागू आहे. आम्हाला हद्दपारीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हे सर्व अतिरेकी आणि नक्षलवाद्यांना लागू नाही, आम्ही तर शेतक-यांच्या उसाला न्यायदर मागत असताना, हे चित्र खेदजनक असल्याची टीका त्यांनी केली. काल मुख्यमंत्री दिल्लीला पंतप्रधानांना भेटायला गेले मात्र, त्यात नवी विमानतळ व मेट्रो रेल्वे संदर्भात चर्चा झाली. या वेळी ऊसदराची चर्चा अपेक्षित होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तशी चर्चा केलीच नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
तालुक्यात जमावबंदी, कडक बंदोबस्त  
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसदरप्रश्नी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कराड आंदोलन क्षेत्र म्हणून निश्चित केल्याने आणि उद्या येथे १ लाखावर शेतकरी येऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधिस्थळी ऊसदराचा न्याय मागणार असल्याने कराडला पोलिसांची टाइट फिल्डिंग लागली असून, पोलिसांसह साखर सम्राट, राज्यकर्त्यांच्या झोपा उडाल्या आहेत. दरम्यान, तालुक्यात ठिकठिकाणी जमावबंदी लागू असल्याचे फलक प्रशासनाने लावले असून, कराडकडे येणा-या शेतक-यांना जागोजागी अडवण्याचा घाट घातला गेल्याचे बोलले जात आहे. त्यावर ‘जेथे अडवाल तेथेच चक्का जाम’ आंदोलन केले जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.  
आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या पाटण कॉलनीत परिसरात शंभर मीटर अंतरापर्यंत जणू संचाबंदी जारी असून, कमालीचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ा कराडात दाखल झाल्या आहेत. तर, त्यातील एक तुकडी पाटण कॉलनीच्या सुरक्षेसाठी राखीव असल्याचे चित्र आहे. शहर पोलीस ठाण्यात आपत्कालीन यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. आंदोलकांच्या हलचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कराडकर नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासास वा परिणामास सामोरे जावे लागू नये म्हणून दक्षता घेतली गेली असल्याचे कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे यांनी सांगितले आहे.