scorecardresearch

”पंतप्रधान मोदी जनतेसाठी नाही तर ‘मेहुलभाई’सारख्या मित्रोंसाठीच काम करतात”

”मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे शहर आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि येथील पोषक वातावरण लक्षात घेऊन जगभरातून गुंतवणूक येत असते.”

narendra modi
narendra modi


मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल दिल्लीतील भाजपा सरकारला कायम आकस राहिला असून, मुंबई व राज्याचे महत्त्व कमी करण्याचा विडाच मोदी सरकारने उचललेला आहे. शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला हलवून महाराष्ट्राचे नुकसान करण्यात आले. आता मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तांचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे जाणीवपूर्वक केले जात असून महाराष्ट्राला बरबाद करण्याच्या भाजपाच्या धोरणचाच भाग आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे शहर आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि येथील पोषक वातावरण लक्षात घेऊन जगभरातून गुंतवणूक येत असते. औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मागील काही वर्षापासून प्रयत्न सुरु आहे. शिंदे सरकार आल्यानंतर वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिव्हाइस पार्क आणि आता टाटा एअरबस हे मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. याआधी फडणवीस सरकार असताना मुंबईतल्या ‘बीकेसी’मध्ये होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमधल्या गांधीनगरला हलवण्यात आले. पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचे ऑफिस दिल्लीला हलवले, नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता यातील एक मोठा गट गुजरातला गेला. मुंबई व राज्यातील महत्वाची कार्यालये व प्रकल्प दिल्लीच्या इशाऱ्यावर राज्याबाहेर स्थलांतरीत करण्यात आलेली आहेत. मुंबई गुजरातला नेता येत नाही म्हणून ती उद्ध्वस्त करण्याचा भाजपाचा डाव आहे.

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, निरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रोंसाठीच काम करतात देशातील १४० कोटी जनतेसाठी नाही हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुलजी गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 17:12 IST

संबंधित बातम्या