scorecardresearch

पंतप्रधान मोदींनी जनतेला एप्रिलफूल बनवले- जयंत पाटील

साखराळे येथील ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी’या उपक्रमात ते बोलत होते.

jayant patil in sangli
एकही आश्वासन पूर्ण न करून त्यांनी जनतेला एप्रिल फुल बनविले आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केली (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करतो, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो, दोन कोटी युवकांना नोकऱ्या देतो, प्रत्येक कुटूंबास घर देतो अशी अनेक आश्वासने दिली. मात्र त्यातील एकही पूर्ण न करून त्यांनी जनतेला एप्रिल फुल बनविले आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी शनिवारी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांची विविध आश्वासने आणि १ एप्रिल निमित्त त्या आश्वासनांची खिल्ली उडविणाऱ्या अनेक ध्वनीफिती आपल्या भ्रमणध्वनीवरून ऐकविल्या.

साखराळे येथील ‘एक तास राष्ट्रवादी साठी,महाराष्ट्राच्या विकासासाठी’या उपक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील,सेवादलाचे अध्यक्ष अविनाश पाटील,सरपंच सुजाता डांगे,उपसरपंच बाबुराव पाटील,रामराजे पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

आ.पाटील म्हणाले, राज्य वीज नियामक मंडळाने मोठी दरवाढ मागितली होती. मात्र विरोधी पक्षांनी त्यास प्रखर विरोध केल्याने नाममात्र दरवाढ करण्यात आली. अन्यथा राज्यातील जनतेस वाढत्या महागाईबरोबर मोठा भुर्दंड बसला असता. आपल्या राज्याच्या अर्थ संकल्पातून मागासवर्गीय समाजास ९ टक्के,तर आदिवासी समाजास ११ टक्के पैसे दिले जातात. मात्र या सरकारने टक्केवारीच्या प्रमाणात या दोन्ही घटकांना पैसे दिलेले नाहीत.

सरपंच सौ.सुजाता डांगे म्हणाल्या,राज्य सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली. मात्र सरकार गॅस सिलेंडर दरवाढीकडे डोळेझाक करीत आहे. जनतेत सरकारबद्दल असंतोष असल्याने त्यांचे जि.प. व पं.स.निवडणुका घेण्याचे धाडस होत नाही. यावेळी अमोल पाटील, माजी उपसरपंच सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 19:25 IST

संबंधित बातम्या