विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही – उद्वव ठाकरे

कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यावरणीय बदलामुळे वादळे निर्माण होत आहेत.

सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला भरघोस मदत केली आहे. मोदी संवेदनशील आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रालाही मदत करतील, असे म्हणत, मी विरोधी पक्षनेत्यासारखा वैफल्यग्रस्त नाही, अशी  टीका मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव टाळत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी मालवण चिवला बीचवरील नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले.

कोकणातील समुद्र किनाऱ्यावर पर्यावरणीय बदलामुळे वादळे निर्माण होत आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. कोकणात आलेलं चक्रीवादळ भीषण होतं. या वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांसाठी जे जे काही करता येणं शक्य होईल ते करण्यात येईल. नुकसानीचा आढावा जवळपास झाला आहे. पंचनामेही जवळपास झाले असून दोन दिवसात माझ्याकडे अहवाल येईल. त्यानंतर लगेचच निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

पंतप्रधानांकडून मोठी अपेक्षा

केंद्र सरकारनेही अधिकाधिक मदत करावी म्हणून आम्ही विनंती करत आहोत. आम्हाला पंतप्रधानांकडून मोठ्या मदतीची अपेक्षा आहे. तसं आम्ही त्यांना कळवलं आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. त्यांनी गुजरातला मदत केली. महाराष्ट्रालाही नक्कीच मदत करतील, असा चिमटा काढतानाच आम्हाला राजकारण करायचे नाही, विरोधी पक्षनेत्यांसारखा मी वैफल्यग्रस्त नाही, असा टोला त्यांनी लगावला. विरोधकांनी आमची काळजी करू नये. कोकणाचं आणि माझं नातं घट्ट आहे. कुणी कितीही प्रयत्न केला तरी या नात्यात बाधा येणार नाही, असंही ते म्हणाले.

कायमस्वरुपी आराखडा  तयार करण्याचे आदेश

सागरी किनार पट्टीच्या भागात कायमस्वरूपी काही सुविधा उभारणे गरजेचे आहे. समुद्राजवळ जमिनीखालून विजेच्या वायरी टाकणे, वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेकांचं स्थलांतर करावं लागतं. अशा लोकांना कायमस्वरुपी निवारा देणं आदी गोष्टी करण्यात येणार आहे. हा कायमस्वरुपी आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार केंद्रानेही आम्हाला आवश्यक ती मदत द्यवी, मग ती निधीची असेल किंवा मंजुरीची असेल, ती मदत आम्हाला केंद्राने द्ययला हवी. वारंवार अशा नैसर्गिक आपत्तीत नुकसान होते त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गराजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 दोन दिवसात मदत करू

वादळात मच्छीमार, शेतकरी, बागायतदार यांची जाळी,बोटी,घरे, आंबा, फळबागांचं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टीला मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.मच्छिमारांचंही नुकसान झालं आहे. प्रत्येकाला मदत केली जाईल. कुणालाही नाराज करणार नाही. येत्या दोन दिवसात अहवाल येईल. त्यावेळी निर्णय घेणार आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अँड अनिल परब,आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. मालवण चिवला बीच,निवती आदी भागात मच्छीमार बोटी, घरांची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  केली. चिपी विमानतळावर आढावा घेऊन अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prime minister narendra modi leader of opposition devendra fadnavis chief minister uddhav thackeray akp