Prithviraj Chavan on Davos Invsestment : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावोस दौरा प्रचंड चर्चेत आहे. दरवर्षी दावोसला जाऊन हजारो-कोट्यवधीची गुंतवणूक आणल्याचे करार केले जातात. अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले जाते. मात्र, प्रत्यक्षात या करारांचं पुढे काय होतं? ही बाब गुलदस्त्यात आहे. दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात विक्रमी ३० लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे करार करण्यात आले असून येत्या महिनाभरात आणखी १० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार होतील. यातून ४० लाख रोजगार निर्माण होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर टाटा सन्सच्या साह्याने इनोव्हेशन सिटी उभारण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. यावरूनच, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केला आहे.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच”, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

प्रत्यक्ष गुंतवणूक महत्त्वाची

“मागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे”, असं चव्हाणांनी स्पष्ट केलं.

हा तर एक क्रूर विनोद

“आपल्याच राज्यातील कंपन्याबरोबर दावोसमध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात की आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे. अडाणी आणि लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत”, अशी टीकाही त्यांनी केली.