मोदी इतके लोकप्रिय आहेत तर मग त्यांना सगळ्या ठिकाणी स्वतःचा फोटो का हवा? : पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसवर उत्सव साजरा करणाऱ्या भाजपा नेत्यांवर सडकून टीका केलीय.

संग्रहीत फोटो

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी करोना लसीकरणाच्या १०० कोटी डोसवर उत्सव साजरा करणाऱ्या भाजपा नेत्यांवर सडकून टीका केलीय. “मुळात लस खरेदी करायला केंद्र सरकारने उशीर लावला. इतर देशांनी लसीची ऑर्डर देऊन बुक केल्या होत्या. आपण सगळ्यात शेवटी लस खरेदी केली. ऑर्डर देण्यात उशीर झाल्यानं हा गोंधळ झाला. अजूनही बाहेरच्या बऱ्याचशा लसी आलेल्या नाहीत,” असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “१०० कोटी लस डोस दिले म्हणून कार्यक्रम पार पडला. २७८ दिवसांनी आपण १०० कोटी डोस दिले. हे काम डॉक्टर आणि नर्सेस यांचं आहे आणि त्यासाठी त्यांचं कौतुक आहे. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट केला जातोय. मोदींचा वाढदिवस असो किंवा इतर सर्व गोष्टींचा इव्हेंट केला जातो. आतापर्यंत केवळ ३० टक्के नागरिकांना लस पोहचली आहे. अजूनही आपल्यातील कित्येक नागरिकांना २ डोस मिळाले नाहीत.”

“केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण”

“केवळ २१ टक्के नागरिकांचं पूर्ण लसीकरण झालं आहे. आपल्या देशाचा नंबर १४४ वा लागतो. चीननं ११० कोटी लोकांना दोन डोस दिले आहेत. अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशात बूस्टर डोस द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अजूनही आपली जनता पूर्णपणे सुरक्षित झालेली नाही,” असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

“मोदींनी खासगी कंपन्यांना लस विकत घ्यायला परवानगी दिल्यानं लसीच्या किमती वाढल्या”

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, “पुढील वर्षभर हे लसीकरण सुरू राहणार असं दिसतंय. पहिल्या दिवसापासून केंद्राने लस विकत घ्यायला पाहिजे होती. मात्र, तसे न करता मोदींनी खासगी कंपन्यांना लस विकत घ्यायला परवानगी दिली. यामुळे लसीचे दर वाढवून ठेवले. यामागे मोदी सरकार आहे. याची चौकशी झाली पाहिजे. सगळ्या ठिकाणी मोदींना आपला फोटो हवा असतो. इतकी जाहिरात कशासाठी? मोदी तुम्ही इतके लोकप्रिय आहेत तर आणखी जाहिरातबाजी कशाला? लसीकरण प्रमाणपत्रावर फोटो कशाला? लसीकरण ही जबाबदारी आहे इव्हेंट नव्हे. तिसरा डोस देणार का? लहान मुलांना डोस देणार का? बाहेरील देशातून लस घेतली जाणार का? या सगळ्याबाबत मोदींनी भूमिका स्पष्ट करावी.”

“भारतात बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तानपेक्षा अधिक उपासमार”

“एकबाजूला इंधनावर कर वाढवून सरकार चाललं आहे. जगात उपासमारीचा सर्व्हे केला जातो. भारताचा नंबर १०१ वर खाली पोहचला आहे. आधी तो ९१ नंबरला होता. याचा अर्थ देशात उपासमारीचं प्रमाण वाढलं आहे. आपल्यापेक्षा बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान यांचा नंबर वरचा आहे. याचा नव्यानं जन्माला येणाऱ्या बालकांवर परिणाम होऊ शकतो. जाहिरातबाजीच्या नादात इकडे भाजपा सरकारचं लक्ष नाही. सोया केक आयात केल्याने सोयाबीनचे दर घसरले. तेलाची आयात केली. यामुळे शेतकरी विरोधी भूमिका समोर आलीय,” अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

“मोदींनी कोरोनाला किरकोळ म्हणून घेतलं. त्यामुळे लस खरेदी करण्याबाबत देखील उशीर लावला. २१ दिवसात कोरोनाला घालवू असं म्हटलं होतं. त्याचं काय झालं?” असा सवाल चव्हाण यांनी मोदींना केलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Prithviraj chavan criticize modi government over corona vaccination pbs

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या