Premium

Prithviraj Chavan : “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली, कारण..”, माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

महाराष्ट्रात लवकरच राष्ट्रपती राजवट लागणार असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
महायुतीने जयस्वाल यांना उमेदवारी दिलीतर भाजप कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाही, अशी भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली

Prithviraj Chavan : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र महाविकास आघाडीने निवडणूक जिंकण्याचा दावा केला आहे. आमच्या १७५ ते १८० जागा निवडून येतील असं महाविकास आघाडीने म्हटलं आहे. तर दुसरीकडे महायुतीनेही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाईल असा दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. “महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

हे पण वाचा- Prithviraj Chavan : महाविकास आघाडी समोरील मोठं आव्हान काय? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महायुतीचा…”

महाविकासआघाडीला १८० च्या आसपास जागा मिळणार

“मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या शंभर वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकासआघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे”, अशा हालचाली सध्या सुरु असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. टीव्ही ९ मराठीशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार

महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच ४ जानेवारी २०२५ पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केल्यानेही चर्चा सुरु झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prithviraj chavan former cm said may president rule in maharashtra will start soon scj

First published on: 31-08-2024 at 13:32 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments