कराड : विधानसभा निवडणुकांमधील मतदार याद्यांमधील त्रुटी आणि प्रशासकीय यंत्रणेच्या एकतर्फी आणि निष्काळजी कामकाजावर काँग्रेसचे ज्येष्ठनेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर आरोप केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपची मोठी पिच्छेहाट झाल्यानंतर नागपूर येथील अधिवेशनात कार्यकर्त्यांना १० टक्के मतदान वाढवण्याचे आवाहन केले. दरम्यान, मतदान अनैतिक मार्गाने दुबार व तिबार नोंदीतून वाढवले गेल्याचा दावा चव्हाण यांनी केला. निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेमुळेच लोकशाही प्रक्रियेची पारदर्शकता धोक्यात आल्याचे सांगत, त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर कोरडे ओढले.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी सांख्यिकीय माहिती मांडताना सांगितले की, विधानसभेच्या कराड दक्षिण मतदारसंघात २१,२३२ मतदारांची नावे तब्बल ४८,७४९ ठिकाणी नोंदवली गेली होती. यामध्ये जवळपास १७ हजार जणांची नावे दोनदा, २,८०० जणांची तीनदा, ७०० जणांची चारदा, तर एकाच व्यक्तीचे नाव १५ ठिकाणी आढळल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय शेजारच्या इस्लामपूर, शिराळा, पाटण आणि पलूस- कडेगाव या मतदारसंघांतून बहुतेक दुबार नावे समाविष्ट होती. मतदानावेळची बोटावरील शाई पुसण्यासाठी नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करून, दुबार मतदान घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केला.
दुबार मतदारांची नावे वगळण्याची जबाबदारी पूर्णपणे निवडणूक आयोगाची होती, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की प्रशासकीय निष्काळजीपणामुळेच निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम झाला. दरम्यान, ४८ हजार दुबार नावे कमी केल्याबद्दल चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत.
सांख्यिकीय निरीक्षणे व आरोप
‘कराड दक्षिण’मधील दुबार नोंदींची आकडेवारी मांडताना, त्यांनी २१,२३२ मतदारांची नावे विविध याद्यांमध्ये ४८,७४९ वेळा आढळल्याचा चव्हाण यांचा दावा आहे. त्यात शेजारील मतदारसंघांतीलच नावे आढळल्याचे ते म्हणाले. कराड उत्तर आणि कराड दक्षिणमध्ये ६,०६२ सामायिक मते; तर इस्लामपूर (६,७०८), शिराळा (७,९७६), पाटण (४,१००) आणि पलूस-कडेगाव (२,९६५) मधून एकूण २८ हजार दुबार नोंदींचा आरोप चव्हाण यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांकडून तब्बल ४८ हजार संशयास्पद नोंदी कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुबार मतदानामुळे पराभव
‘कराड दक्षिण’मध्ये मला २०१९च्या तुलनेत २०२४ मध्ये स्वतःची मते ९२ हजारांवरून एक लाखांपर्यंत वाढली असतानाही पराभव झाल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. त्यात विशिष्ट समुदायाची मते वगळणे आणि दुबार मतदानाला वाव मिळणे, ही निवडणूक आयोगाची मोठी चूक माझ्या पराभवाचे कारण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
