लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून महायुतीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. महाविकास आघाडी लोकसभेच्या निवडणुकीसारखं मोठं आव्हान विधानसभेच्या निवडणुकीमध्येही देण्याच्या तयारीत आहे. मात्र, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण असेल? यासंदर्भात महाविकास आघाडीत बऱ्याच चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीमध्येही याबाबत सूचक भाष्य केलं होतं. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा फार्म्युला कसा असेल? याबाबत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार आल्यास उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य असतील का? या प्रश्नावर बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट महाविकास आघाडीचा फार्म्युलाच सांगितला आहे. ते ‘लोकसत्ता लोकसंवाद’च्या कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा : बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचाराला अनुपस्थित; शरद पवार काळजी व्यक्त करत म्हणाले, “ते…”

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील हे तुम्हाला मान्य आहे का? या प्रश्नावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर लढत होतोत तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

या निवडणुकीत मोठा बदल जाणवतो

यावेळी पुढे बोलातना पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक, काँग्रेसचा प्रचार, महाविकास आघाडीची कामगिरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रणनिती यासह वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केलं. चव्हाण म्हणाले, “यंदाच्या निवडणुकीत फार मोठा बदल जाणवतो. आताच्या घडीला माझं महाराष्ट्राचं जे आकलन आहे, त्यानुसार महाविकास आघाडीला लोकसभेला ३२ ते ३५ जागा मिळतील, ही संख्या वाढू शकते. आम्ही या निवडणुकीत पाच मुद्द्यांवर भर दिला आहे. त्यामध्ये महागाई, बेरोजगारी, शेतकरी, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आणि सरकार पाडले वगैरे नैतिक भ्रष्टाचार, शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान बचाव, या मुद्द्यांचा समावेश आहे. हे सगळे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आम्हाला दिले आहेत, असंही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan on uddhav thackeray assembly elections 2024 and mahavikas aghadi new formula for chief ministership formula gkt